Showing posts with label doctors. Show all posts
Showing posts with label doctors. Show all posts

Monday, April 1, 2019

तुझी माझी रिलेशनशिप

प्रिय,
      तुझी माझी रिलेशनशिप जन्मजन्मांतरीची आहे. युगानुयुगे मी तुझ्या प्रेमपाशात शपथबद्ध आहे. एकापरीने आजकालची मुलेमुली म्हणतात, तसे आपले नाते म्हणजे एक 'लिव्ह-इन रिलेशनशिप'च म्हणायला हवी. तुझ्या माझ्या या नात्यासाठी मी माझ्या लग्नाच्या बायकोची आणि मुलांची नेहमीच परवड केली. आपल्या नातेसंबंधात मी एवढा बुडून गेलो होतो की त्यांच्याकडे लक्ष द्यायला कधी वेळ काढलाच नाही.
       मला आठवतात अजूनही आपल्या नात्यातले ते सुरुवातीचे दिवस. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार होतो. तुझ्याकडून होणाऱ्या माझ्या प्रशंसेने आसमंत व्यापून जायचा. तुझ्याद्वारे क्षणोक्षणी होणारी माझी तारीफ, तुझ्या आयुष्यातले माझे मानाचे उच्चस्थान, तुझ्याकडून मला हरघडी मिळणारा आदर, माझे मन तृप्त करायचा. मी होतो प्राणरक्षक, मी होतो पुनर्जीवन दाता आणि हो 'देव'सुद्धा!!
      आपले भारतीय म्हणजे कमालीचे सिनेमावेडे. चित्रपटातील कुठल्याही प्रेमकथेत व्हिलन आल्याशिवाय त्यांना मजा येत नाही. अनेक युगाब्द सुरळीतपणे चाललेल्या आपल्या प्रेमसंबंधातदेखील खलनायकांचा रीतसर प्रवेश झाला. एक आला, दोन आले, एका पाठोपाठ किती आले, तुला आणि मला पत्ताच लागला नाही. पाहता पाहता त्या खलनायकांच्या विषारी पाशात आपल्या रिलेशनशिपला ओहोटी लागली. यातले काही खलनायक माझेच बांधव होते, काही माझे हितशत्रू होते आणि बाकीचे कायद्याचे रक्षक होते.
      माझ्याबाजूने मी अजूनही आपल्या नात्याबाबत ठाम आहे, पण तुझ्या मनावर त्यांच्या खलवृत्तीचा पूर्ण प्रभाव पडल्याचे मला पदोपदी जाणवत आहे. आजही मी वेड्यासारखा तुझ्यासाठी धावत आहे, पण तुला त्याचे काहीदेखील सोयरसुतक नाही.
     
आपल्या संबंधांवर पहिला हल्ला झाला, त्यात मी तुझ्या तब्येतीची बिलकुल पर्वा करत नाही, असे या रक्षकांनी ठरवले. आपल्या नातेसंबंधांना पूर्ण कात्री लावून, तू माझे गिऱ्हाईक आहेस आणि मी दुकानदार असे जाहीर केले. आपले नाते 'कन्झ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट'च्या कक्षेने काबीज केले.
      मी करत असलेल्या तुझ्या सेवेसाठी त्यांनी त्यांचे मापदंड लावायला सुरुवात केली. 'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट'चा घाट घातला. देशातल्या अनेक राज्यात तो तुला आणि मला न विचारता लागू करण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही तो निकराने चालूच आहे.
      आपल्या नात्याला तोडू इच्छिणाऱ्या काही कुऱ्हाडीच्या दांड्यांनी आपले संबंध केवळ आर्थिक आहेत असा शोध लावला. आपल्या नात्यात कुठलीही सचोटी, प्रेम नाही असे ते सांगू लागले. तहानभूक विसरून, कडक थंडी असो, मुसळधार पाऊस असो, रणरणते उन असो; तुझ्या हाकेला दिवसरात्रीची पर्वा न करता, मी जी 'ओ' देत होतो, ती केवळ मूठभर पैशासाठीच असे ते घडोघडी जाहीर करू लागले. तुझी मी करत असलेली निरलस सेवा ही मायेपोटी नसून 'माया' गोळा करण्यासाठी आहे, असा यांचा दावा. मी तुझ्याकडे केवळ तुझ्या पैशांसाठीच येतो. तुला लुटतो आणि माझे उखळ पांढरे करतो असे ते पुरावे गोळा करून सांगू लागले. मायबाप सरकारदेखील त्यांच्या बोळ्यानेच दूध पिऊ लागले.
      तुझी सेवा जास्त चांगली घडावी, तुझ्या आयुष्यातली काळरात्र सरावी, आनंदाचा आरोग्याचा उदय व्हावा, म्हणून उत्तम आणि ज्ञानीजनांच्या सेवामंदिरांचा मार्ग मी तुला दाखवतो, तो प्रत्येक वेळेस फक्त काही 'चवली-पावली' मिळावी म्हणूनच, असा जावईशोध आमच्याच वंशाच्या काही सज्जनांनी लावला. आपल्या संबंधांवर हा कदाचित वर्मी बसणारा घाव असेल. अखेरचा नक्कीच नसेल, कारण असे घाव दरदिवशी माझ्यावर पडतच आहेत. पण हा घाव म्हणजे आपले संबंध पूर्णपणे 'पैशाधिष्ठित' आहेत, असे कायदेशीरपणे बेमालूम सिद्ध करण्याचा आहे. हा वार माझ्यावर केल्याने आपल्या संबंधांना कायमचे संपवल्याचा आसुरी आनंद या 'कर्मवीरांना' मायबाप सरकारच्या आश्रयाखाली मिळणार आहे. 'कट प्रॅक्टिसविरोधी कायदा' असे गोंडस नाव देऊन मला भयभीत करून आपल्या 'रिलेशनशिप'ला कायमचा 'ब्रेक' देण्याची ही आपल्या मित्रांचीच खेळी आहे.
      सध्या माझी मनःस्थिती फारच गंभीर आहे. "राजा जागा रहा. रात्र वैऱ्याची आहे." हा संवाद आठवून माझी रोजची झोपच उडाली आहे. तुझ्या सेवेचे उत्तुंग ध्येय ठेवून या पेशात आलो, रात्रंदिन मरणांसोबतच्या युद्धाचे प्रसंग रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुझ्याकरिता लढलो; पण आता वाटते बस्स!! कायमचे तोडून टाकावेत तुझे माझे संबंध आणि स्वस्थ घरी बसावे हरी हरी म्हणत. गोळा करावे माझ्यासारखे दु:खी कष्टी आणि आम्हाला आदर्श मानून या रिलेशनशिपमध्ये नव्याने अडकू इच्छिणारे. आयुष्याच्या करुण गर्तेत वेगाने फिरताना एका गाण्याचे शब्द सतत आठवतात, 'अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती.'  

      शेवटी वाटते, जाऊ दे. भोळे सांब आहोत आपण. आपली रिलेशनशिपची वाटच चुकली. डॉक्टर-पेशंट नात्याची ही या जगातली आणि या युगातली 'लिव्ह-इन रिलेशनशिप' आपल्याला कळलीच नाही.    

Thursday, March 21, 2019

कशाला व्हायचे डॉक्टर?


परवा एका लग्नात माझ्या मित्राची मुलगी भेटली. मुंबईच्या एका नामवंत इस्पितळात ती एका सुपर स्पेशालिटी कोर्समध्ये सर्जन म्हणून काम करत होती. या इस्पितळाच्या उच्च दर्जाच्या वैद्यकीय सेवेमुळे, तिथल्या नामांकित डॉक्टर्समुळे हे रुग्णालय अखिल भारतातील एक प्रतिष्ठित रुग्णालय मानले जाते. 


साधारणतः वर्षापूर्वी ती मला अशीच भेटली होती, तेंव्हा उत्साहाने ती कशी सळसळत होती. तिच्या वाक्यावाक्यातून त्या इस्पितळात एकेक गोष्ट शिकण्यासाठी कसे अपार कष्ट करून घेतात, याचे कौतुक दिसत होते. तिच्या शब्दाशब्दातून स्वप्न साकारण्यातला तिचा आनंद जाणवत होता. ती म्हणत होती की त्या इस्पितळात दिवसातले १८-२० तास हाडाची काडे करून काम करावे जरी लागत असले, तरी तासनतास घालवून ती चिकाटीने काम करत होती. या अखंड परिश्रमाने तिच्या शस्त्रक्रियेत नैपुण्य आले होते. तिच्या कौशल्यांचे क्षितिज अमर्याद उंचावले होते.
पण परवा मी तिच्याशी बोललो तेंव्हा लक्षात आले की तिने स्वतःची जिद्द पूर्णपणे गमावली होती.
सकाळी ७ वाजता घराबाहेर पडायचे आणि रात्री १० वाजता घरी परतायचे आणि अंथरुणावर अंग टाकायचे. दुसऱ्या दिवशीचे चक्र पुन्हा सुरू करण्यासाठी परत पहाटे ५ वाजता दचकून जागे व्हायचे. तिला वाटले, काय चाललंय हे?  आपल्या कुटुंबियांबरोबरचा आणि यच्चयावत मित्रमंडळींसमवेतचा सारा संपर्क ती गमावून बसली होती. माणूस म्हणून तिचं अस्तित्व संपलं होतं, ती फक्त एक रोबॉट बनली होती. हॉस्पिटलच्या अंतर्गत चाललेले राजकारण आणि तिथल्या तथाकथित सामाजिक जीवनामध्ये अहोरात्र सामील झाल्यामुळे तिचे स्वतःचे जग हरवून गेले होते. 
आणि हे सगळं फक्त दरमहा ५० हजारांमध्ये. ती ज्या रुग्णालयात काम करत होती तिथल्या आयसीयूमध्ये दोन दिवस तिला जर राहावे लागले, तर तिला अक्षरशः औषधालाही  पैसे पुरणार नव्हते.
तिच्या डोळ्यातले पूर्वीचे तेज विझले होते. मला सांगावेसे वाटले तिला की डोंगरावर चढूनजाताना दमायला होतेच; पण तिथे गेल्यावर आजूबाजूचे जग जेंव्हा आपण खुजे झालेले पाहतो ना, तेंव्हा हे कष्ट सोसून आपली महत्वाकांक्षा पूर्ण केल्याचे समाधान मिळते. कदाचित तुझ्या वयाच्या चाळिशीत, तुझ्या इंजिनिअर किंवा आयटी मधल्या मित्रांना आता जो पगार मिळतोय तेवढे पैसे तुला नक्की मिळू लागतील.

पण मी काहीच बोललो नाही.
मध्ये माझा एक वर्गमित्र भेटला. तो सरकारी सेवेत होता. मुख्यत्वे ग्रामीण भागात तीस वर्षे नोकरी करून त्याने स्वेच्छानिवृत्ती घेतली. तेंव्हा त्याच्या बँकेत फक्त १५००० रुपये शिल्लक होते. त्याने कुठल्याही फॉरीन ट्रिपा केल्या नव्हत्या, भारतातल्या नामांकित थंड हवेच्या ठिकाणीसुद्धा तो जाऊ शकला नव्हता. तो अजूनही भाड्याच्या घरात राहतो आणि कार तर सोडाच पण दाग-दागिने किंवा कुठलीही किमती वस्तू तो आयुष्यात स्वतःच्या संसारासाठी घेऊ शकलेला नाही. त्याचा मोबाईल दुरुस्त करायला जेंव्हा तो एका टपरीवजा दुकानात गेला, तेंव्हा गप्पांमध्ये त्या मोबाईल दुकानदाराने त्याची कमाई सांगितली. ती डॉक्टरच्या पगारापेक्षा दुप्पट होती.
त्याने मला सांगितले, तुझ्या आय.एम.ए.मधल्या आपल्या मित्रांना माझा संदेश दे. "वैद्यकीय सेवा म्हणजे समाजसेवा. डॉक्टरांनी पैशांचा नव्हे रुग्णाच्या प्राणाचा विचार करायचा असतो, अशा आवाहनाला भुलून जाऊ नका. ते एक इमोशनल ब्लॅकमेलिंग आहे. माझ्यासारखे भावनिक मूर्ख होऊ नका. स्वतःला आणि आपल्या संसाराच्या, कुटुंबियांच्या वर्तमानाला आणि भविष्याला जपा. कारण तुमच्या आयुष्याच्या अखेरीस तुमच्या सेवेची कुणीही कदर करत नाही, पण तुमची एक जरी चूक झाली तरी तुमचे हातपाय तोडले जातील आणि डोके फोडले जाईल" आणि माझ्या ध्यानात आले की मी पूर्णपणे त्याच्याशी सहमत आहे.
वैद्यकीय क्षेत्रात तीन दशके सेवा केल्यावर तो एका सामान्य टपरीवाल्याइतके पैसे आपल्या कौटुंबिक गरजांसाठी मिळवू शकत नाही?  मग त्याने एवढ्या खस्ता खाऊन एमबीबीएस होण्याची आणि डॉक्टरी करण्याची शिवाय सेवा म्हणून ग्रामीण भागात जाण्याची काय गरज होती?
आज भारतामध्ये डॉक्टरांनी प्रामाणिकपणे व्यावसायिक कष्ट करून पैसे मिळवणे हा एक प्रकारचा गुन्हा समजला जातोय. डॉक्टर समाजाला लुटतायत असा प्रचार केला जातो. पण त्याच वेळी न्यायाधीश, वकील, सरकारी अधिकारी, सरकारी कंत्राटदार, सिनेनट आणि अशिक्षित राजकारणी असंख्य घोटाळे करून कोट्यवधी रुपये मिळवतात त्याकडे पूर्णपणे डोळेझाक केली जाते आहे. तर मग डॉक्टर बनण्यासाठी इच्छुक असलेले आजचे सर्व विद्यार्थी डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहण्याचा वेडगळपणा करतायत असं  मानायला नको का?  का बनावे त्यांनी डॉक्टर्स? 
आजच्या डॉक्टर होऊ इच्छिणाऱ्या तुमच्या आमच्या मुलांकडून आणि विद्यार्थ्यांकडून समाजाची तसंच राजकारण्यांची अपेक्षा पाह्यला गेलो तर काय लक्षात येते? 
१. खेड्यांचा विकास करायला जर सरकार अपयशी ठरले आहे, तिथली वैद्यकीय सेवा कुठल्याही इन्फ्रास्ट्रक्चरची सुविधा अपेक्षित न ठेवता आपण का सांभाळावी?
२. तुम्ही गरीब रुग्णांचे ऑपरेशन खाजगी रुग्णालयात करा. पण ६०,००० रुपयांच्या शस्त्रक्रियेसाठी सरकारकडून ६५० रुपयेच मिळतील.
३. अशी जवळजवळ मोफत सेवा ग्रामीण देण्यासाठी वकील, इंजिनियर यांच्यावर सक्ती नाही. मोबाईलच्या, पेट्रोल-डिझेलच्या आणि अशा इतर गोष्टींच्या दरात कसलीही कपात नाही. कारण वैद्यकीय सेवा ही समाजसेवा आहे आणि प्राण वाचवणारी आवश्यक सेवा आहे. इतर सेवा या गरजा नाहीत. सेवेचा मक्ता फक्त डॉक्टरांचाच आहे. 
४. वर्षानुवर्षे पारखून तुम्ही जी औषधे वापरता, ती जगातील उत्तम फार्मास्युटिकल कंपन्यांची औषधे अजिबात वापरू नका. त्या ऐवजी दर्जाची खात्री नसलेल्या, जेनेरिक कंपन्यांचे प्रॉडक्ट्स लिहा. मात्र रुग्णांना जर बरे वाटले नाही तर त्याची जबाबदारी तुमची.
५. शक्य तितक्या जास्त रुग्णांना मदत करण्याची नैतिक जबाबदारी डॉक्टरांवरच असते.  आणि म्हणून त्यांनी स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतांपेक्षा जास्त काम करायचे असते.


६. जेव्हा काही दुर्घटना घडते आणि रुग्ण मृत्युमुखी पडतो, तेंव्हा औषधांच्या सदोषतेकडे किंवा उपलब्ध नसलेल्या सोयींकडे लक्ष द्यायचे नसते. डॉक्टरांनीच सारे निस्तरायचे असते. कारण चांगली औषधे डॉक्टर्स फक्त स्वतःच्या फायद्यासाठी वापरतात असे ओरडून ओरडून सांगितले जाते.
७. रुग्ण बरा झाला तर डॉक्टरचं ते कर्तव्यच असते. पण नाही झाला, तर त्याचे डोके फोडायचे आणि त्याचा दवाखाना. हॉस्पिटल उद्धवस्त करायचे असते.
८. डॉक्टरांच्या उपचारा दरम्यान रुग्ण दगावला तर तो आजाराचा दोष नाही, डॉक्टरांचाच आहे. असे सांगायला राष्ट्रीय वाहिन्यांवर मोठमोठ्या सेलेब्रिटी, धुरंधर राजकारणी आणि डॉक्टरांचा पिच्छा पुरवणारे स्वयंघोषित रुग्णसहयोगी तयारच असतात.
९. डॉक्टरांनी त्यांच्यावर अन्याय झाला तर संप करायचा नाही. 
आज परिस्थिती अशी आहे, की अनेक वर्षे डॉक्टरी करत राहिल्यामुळे, मनात असले तरी ती अनेकांना सोडता येत नाही. कारण जर वैद्यकीय ज्ञान वगळता आपल्याकडे कुठलेही पैसे मिळवायचे स्किल नाही. फारतर कुठेतरी लेखनिक किंवा कार ड्रायव्हर म्हणून काम करण्याशिवाय गत्यंतरच नाही, अशी अनेकांची परिस्थिती आहे. 
मग सांगा पाहू आपल्या मुलांनी तरी या गोष्टी सहन करत का आपली डोकी फोडून घ्यायची?

Saturday, March 9, 2019

भाऊ माझं चुकलं

भाऊ माझं चुकलं
-डॉ.अविनाश भोंडवे
'चुकीच्या औषधाने रुग्णाचा मृत्यू'
'चुकीच्या शस्त्रक्रियेने रुग्ण दगावला'

'चुकीच्या इंजेक्शनमुळे पाच पेशंट्स अत्यवस्थ'
अशा अर्थाच्या बातम्या आपण वर्तमानपत्रात '२४ XX ३६५'दा वाचत असतो. अशा बातम्या सांगताना टेलिव्हिजनच्या काही वाहिन्यांवर तर डॉक्टरांवर स्वैर मुक्ताफळं उधळताना, त्यातल्या वृत्तनिवेदकाच्या जिभेवर हुताशनी पौर्णिमा उन्मुक्तपणे ऱ्होंबा-सोम्बा नृत्य करत असते.
वर्तमानपत्रे आणि मिडियाला अभिप्रेत असलेली चुकीची औषधे, चुकीची ऑपरेशन्स यातला तथ्यांश लक्षात घेतला, तर त्यांना औषधे देताना, प्रोसीजर करताना झालेल्या चुका अभिप्रेत असाव्यात असं लक्षात येतं. पण बातम्यांमध्ये पिवळे-लाल रंग भरून टीआरपी वाढवण्याच्या हव्यासापोटी हे शब्द जाणूनबुजून पुन्हा पुन्हा वापरले जातात, हेसुध्दा लपून राहत नाही.
तसं पाहिला गेलं तर, वैद्यकशास्त्र हे अबोध आणि अपूर्ण शास्त्र आहे.यात २+२=४, असे उत्तर अनेकदा येताच नाही. 'एव्हिडन्स बेस्ड मेडिसिन;चा कितीही उदोउदो केला, तरी अनेक गोष्टी या ठोकताळ्यांवर आणि पूर्वानुभवावर आधारित असतात. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरांच्या आयुष्यात लहानमोठ्या चुका अधूनमधून घडतच असतात. १९९९ साली 'इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिन' या स्वायत्त अमेरिकन संस्थेने वैद्यकीय उपचारातील चुकांनी मृत्युमुखी पडलेल्या तब्बल ९८००० रुग्णांची पहाणी प्रसिद्ध केली होती. काही काळापूर्वी रीडर्स डायजेस्टनेदेखील 'माझ्या मेडिकल प्रॅक्टिसमधील चुका' असा एक लेखसंग्रह एका अंकात प्रसिद्ध केला होता.
परदेशात ठीक आहे, पण आपल्या देशात जर अशा चुका आपण कबूल करत गेलो, तर काय होईल? आपण डॉक्टर मित्रांच्या बैठकीतसुध्दा आपल्या चुका मान्य करत नाही. कारण अगदी सुरुवातीला व्हेनमध्ये सुई घालताना डबल पंक्चर होऊन आयव्ही आउट जाण्यापासून ही सुरुवात होते. पुढे अनेक गोष्टी घडतात. कधी अॅक्ट ऑफ ओमिशन तर कधी कमिशन…….. ......पण चुका या होतच राहतात. क्रिकेटमध्ये जसा स्ट्राईक रेट मोजला जातो, तसा एकुणात होणाऱ्या चांगल्या आणि यशस्वी उपचारांमध्ये या चुका झाकल्या जातात.
मध्यंतरी एका नामवंत वृत्तपत्रात आपल्याच एका डॉक्टर लेखकांनी असे प्रतिपादन केले होते की डॉक्टरांनी आपली चूक रुग्णापाशी कबूल करावी, म्हणजे तो त्वरित म्हणेल, "डॉक्टर तुमच्या हातात माझा जीव सोपवलाय, चूक झाली तरी तुम्हीच मला जगवणार" पण हे खरेच असे होईल का?
मृत्यूपंथाला लागलेल्या रुग्णाला इस्पितळात भरती केल्यावर त्याच्या आजाराच्या गांभीर्याने मरण आले, तरी त्या डॉक्टरलाच जबाबदार धरले जाते. रस्त्यावरच्या अपघातात जबर जखमी झालेली व्यक्ती उपचारादरम्यान दगावली, तर अपघातात त्या माणसाला ठोकणाऱ्या वाहनचालकाला नव्हे तर त्या रुग्णालयातल्या डॉक्टरांना आणि त्यांच्या सेवेला दोष दिला जातो. बेशुद्ध आणि गंभीर अवस्थेतल्या रुग्णाचे प्राणोत्क्रमण झाले तर ती चूक डॉक्टरांच्या माथी मारली जाते.
गेल्या काही वर्षात अशाच न घडलेल्या चुकांसाठी डॉक्टरांचे दवाखाने फोडण्यात आले, रुग्णालयांची मनसोक्त तोडफोड करण्यात आली, असंख्य डॉक्टरांना यथेच्छ धोपटण्यात आले. मग जर संत बनून आपली चूक व्यक्त करणाऱ्या डॉक्टरचे काय होईल?
पदोपदी ठोकर खाणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात एकीकडून समाज आणि समाजकंटक, दुसरीकडून वर्तमानपत्रे आणि मिडीया, तिसरीकडून सर्व माननीय लोकसेवक, आमदार, खासदार यांची आगपाखड चालूच असते. या साऱ्याची फिर्याद मायबाप सरकारकडे करण्यातही काही हशील नसते; कारण सरकार दर पाच-सहा महिन्यांनी 'डॉक्टरांना फटके घालायला आता नवा कुठला कायदा आणावा?' या विवंचनेत गुंग असते. अशा परिस्थितीत उपचारांमध्ये चूक झाली, असे एखाद्या डॉक्टरने सांगितले, तर सांगणाऱ्या प्रामाणिक डॉक्टरचा फोटोच त्याच्या नर्सिग होममध्ये कागदी फुलांचा हार घालून टांगलेला दिसेल.
कित्येकदा आपल्याला जी गोष्ट चूक म्हणून वाटते, ती चूक असेलच असंही नाही. आयएमएच्या मेडिको-लीगल सेलशी संपर्क साधलात, तर ती कदाचित चूक नाही, हेदेखील लक्षात येईल. त्यामुळे अगदी 'रेस इस्पा लोकिटा' मधली घटना नसेल, तर घाईघाईने आपली चूक नसताना का कबूल करावी?

शेवटी काय? एकतर चूक करू नका, केल्यास जाहीर कबूल करू नका. सल्ला घ्या. आपल्या यशामुळे अग्निमांद्य होणारे असंख्य 'हितमित्र' आजूबाजूला असतात. वैद्यकीय सेवेतील रात्र नेहमीच वैऱ्याची असते. डॉक्टरराजा सावध रहा. उगीचच 'भाऊ माझं चुकलं' म्हणायची घाई करू नका.        

Monday, March 4, 2019

बदलले पुणे,बदलले डॉक्टर्स, बदलले रुग्ण


बदलले पुणे,बदलले डॉक्टर्स, बदलले रुग्ण


दुनिया बदले, मौसम बदले, धरती अपनी साडी बदले, तुम बदलो पगडी...

कल आज और कल के पल पल जुडती जाये कडी .....

राज कपूरच्या कल आज और कल सिनेमातल्या या गाण्याप्रमाणेच गेली पन्नास वर्षात पुण्याचे हवामान बदलले,वस्ती बदलली, लोक बदलले आणि त्यांच्या प्रमाणेच डॉक्टर्स,हॉस्पिटल्स आणि रुग्ण देखील बदलले.

      १९६० पर्यन्त पुण्यातील वैद्यकीय सेवा कांही मोजके फॅमिली डॉक्टर्स आणि ताराचंद हॉस्पिटल, के.इ.एम्.हॉस्पिटल, ससून आणि काही छोटी रुग्णालये, प्रसूतिगृहे एवढीच मर्यादित होती. जनरल प्रॅक्टिस करणारे बहुसंख्य डॉक्टर्स एल.सी.पी.एस.,जी.एफ.ए.एम्.,एम्.बी.बी.एस. असेच होते. त्यांचे दवाखाने रुग्णांच्या गर्दीने तुडुंब भरलेले असायचे. तिथली ट्रीटमेंट म्हणजे कमीत कमी औषधे आणि घरगुती उपायांचे सल्ले असायचे. म्हणजे पोट दुखले तर ओव्याने शेका, ताप आला तर गार पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवा, घसा दुखला तर मिठाच्या पाण्याच्या गुळण्या करा. त्याच बरोबर पित्तासाठी तिखट कमी खा, दूध प्या, जुलाब कमी व्हायला केळी  खा ,सफरचंदाचा गर उकडून घ्या...वगैरे खाण्यापिण्याबाबतचे सल्ले असायचे. दवाखाना संपल्यावर डॉक्टर बऱ्याचदा जे खूप आजारी असलेल्या पेशंट्सच्या घरी व्हिजिटला जायचे. डोक्यावर हॅट, अंगावर कोट,कडक इस्त्रीची बहुधा क्रीम कलरची पँट खोचलेला पांढरा शर्ट, पायात बूट किंवा कडक चामड्याचे सँडल्स, एका हातात ती पूर्वीची सुप्रसिद्ध वेगळीच रचना असलेली व्हिजिट बॅग अशा जामानिम्यात डॉक्टरांची स्वारी निघायची. रुग्णाचे घर जवळच असेल तर हातात छत्री घेऊन पायीच आणि लांब असेल तर रुग्णाचा नातेवाईक टांगा घेऊन डॉक्टरांना न्यायला आलेला असायचाच. क्वचित प्रसंगी सायकल किंवा लँब्रेटासारखी आता इतिहासजमा झालेली गाडी असायची.त्या काळात डॉक्टर रुग्णांची सेवा करायचे आणि सारा समाज, सारे रुग्ण डॉक्टरांना देव मानायचा आणि देवाचा शब्द अंतिम असायचा त्याला प्रतिवाद नसायचा!

      पण हळू हळू सारे बदलत गेले. स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या वाढली.वैद्यकीय क्षेत्रात वेगवेगळे बदल होत गेले आणि वेगवेगळ्या शारीरिक आजारांचे तज्ञ आले. त्यानंतर साहजिकच सुपर स्पेशालिस्ट आले. आधी फक्त फिजिशियन होते मग हृदयरोग,मधुमेह,मानसरोग तज्ञ, त्वचारोग तज्ञ असे प्रकार आले. आधी फक्त सर्जन होते,मग पोटाचे,छातीचे,मूत्रपिंडाचे तज्ञ आले. दुर्बिणीने शस्त्रक्रिया होऊ लागल्यावर वेगवेगळया आजारांच्या विविध शस्त्रक्रियांसाठी त्यातलेसुद्धा तज्ञ उपलब्ध झाले. आधी फक्त अस्थिरोग तज्ञ होते मग हाडांच्या फ्रॅक्चरचे वेगळे,मणक्यांचे वेगळे, अस्थिरोपण करणारे आणखीनच वेगळे उच्च शिक्षित तज्ञ निर्माण झाले. साध्या डोळ्यांच्या बाबतीतसुद्धा मोतीबिंदूचे, डोळ्याचा नंबर कमी करणारे, दृष्टिपटलाचे, डोळ्यातल्या अंतर्भागाचे, असे वेगवेगळे तज्ञ दिसू लागले. क्ष-किरण तज्ञांमध्ये साध्या एक्स-रेचे, स्पेशल इन्वेझिव्ह प्रोसीजरचे, सोनोग्राफीचे, सिटीस्कॅनचे, एम्.आर.आय.चे, अशा असंख्य शाखा आणि उपशाखा निर्माण झाल्या. आधी डॉक्टरांच्या पॅथॉलॉजी लॅब्ज होत्या, मग डायग्नोस्टिक सेंटर्स दिसू लागली.

पूर्वी फिजीशियनचे वेगळे, सर्जनचे वेगळे,प्रसुतीसाठी वेगळी अशी प्रत्येक शाखेची स्वतंत्र इस्पितळे होती. ससून,के.इ.एम्. अशी सोडता तुरळक सर्वसाधारण रुग्णालये असत; परंतू सत्तरीच्या दशकापासून सर्व सेवा एकत्रित देणारी इस्पितळे वाढली आणि आता तर मल्टी-स्पेशालिटी हॉस्पिटल हा तर नियमच झालाय. १५० ते ५०० खाटांची बहुमजली रुग्णालयांची संख्या लक्षणीय रित्या वाढली. एका डॉक्टरने हॉस्पिटल काढणे बंद झाले आणि वेगवेगळ्या डॉक्टरांच्या समुहाने असे रुग्णालय काढणे सर्रास सुरू झाले. भारतातील मुक्त अर्थव्यवस्थेच्या उदयानंतर तर कार्पोरेट हॉस्पिटल्सची रांगच लागली.

स्पेशालिस्ट डॉक्टरांची संख्या जस-जशी वाढू लागली तास तशी फॅमिली डॉक्टरांच्या संख्येत आणि त्यांच्याकडच्या रुग्णांमधील संख्येत जाणवण्याएवढा फरक पडला. बी.ए.एम्.एस.;बी.एच.एम्.एस. अशा पदवीधारक डॉक्टरांची संख्या वाढली. साऱ्या एम्.बी.बी.एस. डॉक्टरांनी पदव्युत्तर शिक्षण घेणे पसंत केल्याने त्या शाखेचे फॅमिली डॉक्टर विरळाच दिसू लागले. औषधे,काढे,चूर्ण पुडीतून किंवा डोसेजची पट्टी लावलेल्या बाटलीतून देण्याऐवजी रेडीमेड गोळ्या आणि सीलबंद बाटल्या देण्याची सुरुवात झाली. आणि आतातर फक्त औषधांची चिट्ठी रुग्णाला देऊन तपासणी फी आकारणे आणि अत्यवस्थ रुग्णाला इस्पितळांचा मार्ग दाखवणे एवढेच काम फॅमिली डॉक्टर करताना दिसतात.

पुण्याच्या सभोवती जस-जशी कारखान्यांची भरभराट होऊ लागली, व्यापारात समृद्धी येऊ लागली तास-तशी लोकांची फॅमिली डॉक्टरांकडे जाण्याऐवजी तज्ञ डॉक्टरांकडे जाण्याचा कल वाढला. प्रत्येक आजाराचे तज्ञ गल्लो-गल्ली उपलब्ध झाल्याने, ज्या अवयवाचा त्रास असेल त्याविषयीच्या तज्ञांना दाखवणे रुग्णांना सोयीचे वाटू लागले. त्यातच एकत्र कुटुंबपद्धती संपुष्टात येऊन विभक्त कुटुंबे निर्माण झाल्याने कुटुंब-वैद्य म्हणजेच फॅमिली डॉक्टर ही संस्था मोडकळीस आली. यामुळे तज्ञ डॉक्टरांकडे रुग्णांची आता तुडुंब गर्दी दिसू लागली. त्यातच विविध कंपन्यांतील वैद्यकीय बिलाच्या परतफेडीच्या सुविधांमुळे आणि मेडिक्लेमसारख्या आजारपणाच्या विम्यांमुळे सर्व-सामान्य जनतेमध्ये इस्पितळात दाखल होऊन उपचार घेणे सोयीचे होऊ लागले. त्यामुळे खाजगी रुग्णालयांकडील ओघ खूपच वाढला. इतका की आज एवढी मोठमोठी इस्पितळे असूनसुद्धा बऱ्याच रुग्णालयामध्ये बाराही महिने खाटाच शिल्लक नसतात. दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येमुळे आणि जनतेच्या या विचार प्रवृत्तीमुळे जवळ जवळ साऱ्या रुग्णालयांनी आपल्या विस्तार योजना अमलात आणल्या.

या सगळ्या यांत्रिकीकरणाचा आणि मुक्त अर्थव्यवस्थेचा परिणाम म्हणून डॉक्टरना देव मानणे संपले. नव्वदीच्या दशकामध्ये आलेल्या कायद्याने डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संबंध ग्राहक संरक्षण कायद्याखाली आले. रुग्ण आणि डॉक्टर दोन्ही वर्ग सेवेपेक्षा पैशांना, ज्ञानापेक्षा महागड्या तपासण्यांना अधिक महत्व देऊ लागले. एकीकडे रुग्णालयाकडून, दुसऱ्या डॉक्टरकडून  कमिशन घेणारा डॉक्टर दिसू लागला, तर त्याचवेळेस खोटी बिले घेऊन आपण काम करतो त्या कंपनीला आणि विमा कंपनीला लुबाडणारा चाकरमानी रुग्णवर्ग निर्माण झाला. रुग्णांकडून डॉक्टरांवर खटले होऊ लागले, रुग्ण दगावल्यास डॉक्टरांना दमदाटी, मारहाण, रुग्णालयाची मोडतोड अशा घटना वारंवार घडू लागल्या.

वैद्यकीय सेवेचा महत्वाचा एक भाग म्हणजे औषधे आणि औषधाची दुकाने. पन्नास वर्षात औषध शास्त्रात प्रचंड क्रांती होत गेली. वेगवेगळ्या आजारांवरची नवनवी औषधे आली. येतच राहिली. महागडी औषधे देणारा डॉक्टर म्हणजे मोठा डॉक्टर असे मानणारा वर्ग तयार झाला आणि महाग औषधे म्हणजे उत्तम औषधे असं मानणारा वैद्यक समाजदेखील उभा झाला. औषध कंपन्यांकडून पूर्वी नुसती माहिती आणि औषधाची सँपलच मिळायची, पण आता परदेश वाऱ्या, महागड्या भेटवस्तू आणि वेळप्रसंगी रोख रक्कमदेखील मिळायला लागली. ‘वेष असावा साधाभोळा पण अंतरंगी नाना कळा’ अशा वर्णनाचे डॉक्टर काळाच्या पडद्याआड गेले आणि उत्तम चारचाकी, महागडे पेहराव, सारी लेटेस्ट गॅजेट्स, आलिशान घर, उच्च राहणीमान या गोष्टींच्या विळख्यात सापडलेल्या आणि सिनेमातल्या नटाप्रमाणे राहणाऱ्या पेज थ्री डॉक्टरांचा जमाना दिसू लागला.

एकूणच समाजातल्या ढासळत्या नैतिकते बरोबर डॉक्टरांची प्रतिमा घसरत गेली. झगमगाट वाढला,पण पावित्र्य नष्ट झाले. रुग्णालयांच्या इमारतींची उंची वाढली, पण त्या इमारतीच्या आतील माणुसकी कमी झाली. नवनवीन उपचार आले, पण गरीब वर्ग त्यापासून दूरच होत राहिला. सारे पुणे बदलत गेले तसे डॉक्टरांचे राहणीमान, आचार-विचार, त्यांची जीवनपद्धती सारेच बदलत गेले.सारा समाजच पोकळ आणि दिखाऊ गोष्टींना महत्व देऊ लागला. वैद्यकीय समाज याला अपवाद होऊ शकला नाही. आज समाजाच्या बदलेल्या जीवनपद्धती, त्यांचे आमूलाग्र बदललेले आदर्श, माणुसकीपेक्षा पैशाला आलेले त्यांच्या जीवनातले महत्व, यामध्ये डॉक्टरवर्ग वेगळा राहू शकत नाही. आणि रुग्ण म्हणजे तर समाजच! त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वीची डॉक्टरची देवत्वाची मूर्ती आजच्या घडीला पूर्णच भंग पावलेली आहे आणि विशेष म्हणजे भक्तानेही पावित्र्य त्यजले आहे. हे परिवर्तन चांगले की वाईट , योग्य की अयोग्य हे काळच ठरवेल कारण, या विश्वात एकाच गोष्ट आहे चिरंतन, परिवर्तन आणि परिवर्तन!

  

-----डॉ.अविनाश भोंडवे

Monday, March 21, 2016

बोचऱ्या जखमा


शाळा कॉलेजात असताना माझ्यावर समाजाच्या सेवेचे चांगले संस्कार होते. अगदी एम.बी.बी.एस. होऊन इंटर्नशिप संपेपर्यंत ते कायम होते. पण प्रॅक्टिस सुरू करताना, एक विशेष अनुभव आला. त्याचं असं झालं, की दवाखान्याच्या सजावटीसाठी पडदे लावायचे होते. माझ्या नॉन-मेडिकल भावाने जाऊन ते आणले. पडदे लावल्यावर लक्षात आलं की एक पडदा कमी पडतोय. म्हणून मी स्वतः त्याच कापडाचा नमुना घेऊन त्याच दुकानात गेलो. तिथं सांगितलं, “दवाखान्यासाठी पडद्याचं कापड काल नेलं होतं. थोडं कमी पडतंय, अजून तेच कापड हवंय.” मला कापड मिळालं. संध्याकाळी घरी हिशेब करताना भावानं सांगितलं की त्याला ते पंचवीस रुपये मीटरने पडलं आणि मला  पस्तीस रुपये मीटरला मिळालं. भाऊ म्हणाला, “बावळट आहेस. तू दवाखान्यासाठी पाहिजे म्हणाला असशील. मग साहजिकच आहे. तो तुला कापणारच.”
हाच अनुभव मला स्कूटरच्या प्लगमधला कचरा ओळखीच्या मेकनिक काढून काढताना यायचा. इतरांकडून दोन किंवा पाच रुपये, माझ्याकडून दहा. मला लक्षात आलं, की आपण किती अपरिपक्व आहोत. समाजाची सेवा करायची, गरिबांना कमी पैशात उपचार करायचे, वेळेला अडल्या नडल्याला पैसे मागायचे नाहीत, या बाण्याने आपण वागतो आहोत. ते कितपत बरोबर आहे? समाजासाठी आपण कितीही कमी पैशात उपचार केले, तरी आपल्याला ते डॉक्टर म्हणूनच वागवणार. कमी पैशात नाहीतर मोफत सेवा मिळवणे हा त्यांचा हक्क आहे, त्या बदल्यात आपल्याला लुबाडण्याचा हक्कसुद्धा, एकावर एक फ्री असा त्यांना मिळतो. समाजातील वर्किंग क्लासचा आपल्याकडे पाहायचा हा दृष्टिकोन मला अंतर्बाह्य हलवून गेला.
काही वर्षांपासून मी एका प्रतिष्ठित सामाजिक संस्थेचा सदस्य आहे. समाजातील अतिउच्च उत्पन्न गटातील खूप नामवंत आणि हरहुन्नरी व्यक्ती त्या संस्थेत आहेत. अशाच एका सभेला मी गेलो. अनेक मेडिकल प्रॉजेक्टमध्ये डॉक्टरची गरज लागते म्हणून मला खास निमंत्रित करण्यात आले होते. तिथे एका लब्ध प्रतिष्ठित व्यक्तीशी माझी ओळख करून देण्यात आली. मी त्याच्याशी हस्तांदोलन केल्यावर त्याने विचारले, “तुम्ही डॉक्टर आहात ना? इथं येण्यापूर्वी हात धुतले होते ना? नाहीतर मला हात धुवायला लागतील.” त्याच्या या बोलण्यात कुठेही विनोदाचा लवलेश नव्हता. वाक्बाण थेट माझ्याकडे नजर रोखून विचारला होता. कुणी कौतुक केले तर आपण म्हणतो, अंगावर मूठभर मांस चढलं. मग या अशा कॉमेंटला काय म्हणायचं? इथं या बाबानं माझं मांसच नाही, तर सगळी हाडं देखील उतरवली होती.
आपण डॉक्टर म्हणून स्वतःला खूप काहीतरी समजत असतो, आपण एक प्रतिष्ठित वर्गात मोडतो, असाही भ्रम आपल्याला असतो. माझ्या या भ्रमाचा भोपळा असा कैकवेळा या ‘सो कॉल्ड’ उच्च वर्गीयांनी फोडून त्याचा चेंदामेंदा केलाय. आर्थिकदृष्ट्या उच्च असो वा कनिष्ठ असो समाज डॉक्टरांकडे काय नजरेने पाहतो? अशा अनुभवांनी आणि विचारांनी मनात भळभळणारी एक खोल वेदनाच उमटते.
आणखीन एक घटना, अगदी परवाचीच. तरुणाईने बजबजलेल्या आणि नामवंत कॉलेजेस असलेल्या एका पुण्यातल्या एका रस्त्याने मी स्कूटरवरून चाललो होतो. रस्त्यावर पलीकडच्या बाजूने, आपल्या सगळ्यांना गुरूतुल्य असे, पुण्यातले एक नामवंत सर्जन रस्ता ओलांडत होते. तेवढ्यात मोटरसायकलवरून दोन टारगट तरुण वेगाने आले. आपले ‘सर’ त्यांना धडकता धडकता वाचले. त्यांनी त्या मुलांकडे त्यांच्या तीक्ष्ण नजरेने पाहिले.
ती आत्मविश्वासपूर्ण नजर एकेकाळी मरणासन्न रुग्णांना धीर देऊन जीवनदान द्यायची आणि ऑपरेशन थिएटरमध्ये  भल्या भल्या डॉक्टरांना चळाचळा कापायला लावायची. पण त्या युवकांना त्याचं काहीच नव्हतं, ना त्यांच्या वयाबद्दल काही आदर होता. “ए म्हाताऱ्या, बघून चाल की XXव्या..” यानंतर पुन्हा त्या मुलांकडून काही शिव्यांची लाखोली. माता-भगिनींचा उद्धार करणारी भाषा वापरत ते तितक्याच वेगाने निघून गेले. सर दचकून इकडे तिकडे पाहत होते. कदाचित  आपल्या अपमानाला कोणी साक्षीदार तर नाही ना? याची खातरजमा करत होते.
मी स्कूटर लावून त्यांच्या जवळ गेलो. त्यांना विचारले, “सर लागले तर नाही ना?” त्यांनी माझ्याकडे पाहिले. त्या नजरेत अश्रू तरळल्याचे मला जाणवले.... क्षणभरच पण एक विषण्णता जाणवली. आयुष्यभराच्या तपश्चर्येचे हेच फळ का? असे भाव मला जाणवले, पण फक्त क्षणभरच... “थँक्यू” ते मला म्हणाले आणि ताठ मानेने रस्ता क्रॉस करून निघून गेले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहताना मला जाणवले, डॉक्टरने आयुष्यात कितीही थोर काम करू द्या, रस्त्यावरच्या लोकांच्या दृष्टीने तो कुणीच नसतो. असला तर तो एक म्हातारडा असतो.
तो पडदेवाला, मेकॅनिक, संस्थेतला श्रीमंत माणूस, रस्त्यावरची टवाळ मुले....साऱ्यांच्या दृष्टीने आपण सामान्य असतो...अगदी अतिसामान्य...लुटण्यास योग्य आणि टोमणे मारायला, शिव्या आणि वेळप्रसंगी मारहाण करायला..एक सॉफ्ट टारगेट..