Friday, March 6, 2020
Thursday, July 11, 2019
माझे पेशंट्स माझे गुरु
१३ डिसेंबर १९८३ रोजी मला
एम.बी.बी.एस.चे रजिस्ट्रेशन मिळाले आणि केवळ तीन आठवड्यातच म्हणजे ५ जानेवारी १९८५
ला मी माझ्या दवाखान्याचे उद्घाटन केले. मला मेरीटने मिळालेली पदव्युत्तर
शिक्षणाची जागा मी घेतली नाही. आपण फॅमिली डॉक्टर म्हणूनच व्यवसाय करायचा हे मी
पक्के ठरवले होते.
डॉक्टरांना आपली जाहिरात करता
येत नाही. जनसंपर्क आणि रुग्णांवर इलाज करताना आलेले यश यावरच त्याची प्रसिद्धी
आपोआपच होत असते, हे मला पक्के माहिती होते. यालाच त्याकाळी 'या डॉक्टरांचा लगेच
गुण येतो' असे म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे
उद्घाटनाच्याच्या आधी आठवडाभर मी आजूबाजूच्या सुमारे शंभर घरांमध्ये
उद्घाटनानिमित्त ठेवलेल्या सत्यनारायण पूजेच्या तीर्थप्रसादाच्या निमंत्रण पत्रिका
वाटल्या. 'निमंत्रण दिले की जायचेच' ही भावना त्याकाळी ठाम रुजलेली होती. साहजिकच
हे सर्व लोक आठवणीने माझ्या उद्घाटनाला हजर होते. एवढे लोक येतील अशी माझ्या
आई-वडिलांना कल्पना नव्हती. फारतर मित्र आणि नातेवाईक मिळून ५०-६० लोक येतील असे
त्यांना वाटले होते. पण सुमारे ४००-४५० पाहुणे आल्याने तीर्थ आणि प्रसाद परत
बनवावा लागला.
या आलेल्या कुटुंबांपैकी
जवळजवळ सर्व जण आजही संपर्कात आहेत. अधूनमधून का होईना ते माझ्याकडे सल्ला घ्यायला
येतात. आजही दवाखान्यात नंबर लावून बसताना, "आम्ही डॉक्टरांचे पहिल्या
दिवशीपासूनचे पेशंट्स" असे रिसेप्शनिस्टला आणि आजूबाजूला थांबलेल्या लोकांना
अभिमानाने सांगतात. या साऱ्यांच्या प्रेमाने माझी प्रॅक्टिस पहिल्या सहा महिन्यातच
खूप वाढली. आणि अनपेक्षितपणे मी शिवाजीनगर भागातील एक 'चांगला हातगुण असलेला
डॉक्टर म्हणून अल्पावधीतच ओळखला जाऊ लागलो.
त्या ५ जानेवारीला तीर्थप्रसादाला
आलेल्यांपैकी प्रत्येकाने माझी भेट घेऊन काही सूचना केल्या. काहींनी पुष्पगुच्छ
दिले, काही जणांनी आहेरासारखी पाकिटे देऊ केली. (अर्थातच मी ती स्वीकारली नाहीत.)
यामध्ये काही वडिलधाऱ्या व्यक्तींनी मनापासून केलेल्या सूचना अतिशय उपयुक्त
ठरल्या. उदाहरणार्थ-
·
दवाखाना नऊला म्हणजे नऊलाच उघडला पाहिजे.
·
सुरुवातीला पेशंट्स नसले तरी पूर्णवेळ थांब. लोक जाता
येता बघत असतात. दुपारी २ पर्यंत डॉक्टर असतो. मग वेळ आली की बरोबर आठवणीने येतात.
·
या भागातले दवाखाने रात्री नऊला बंद होतात, तुम्ही दहा
पर्यंत थांबा
·
एखादी गरीब भिकारीण आली तरी तिला राणी असल्यासारखी
वागवा. हे गरीबच आपले पेशंट्स असतात.
·
पैसे नसले तर औषध देऊ नका. त्या अमुक तमुक डॉक्टरकडे
उधारी केलेल्या पाचशे जणांची यादी आहे. लोक उधारी ठेवतात आणि मग ती चुकवावी लागेल
म्हणून डॉक्टर बदलतात.
·
कामाला माणसे जवळ राहणारी ठेवा. तुम्हाला उशीरा किंवा
रात्री अपरात्रीपर्यंत दवाखाना चालू ठेवता येईल.
·
या भागात काही लोकांचे वर्चस्व आहे. त्यांचे खूप
नातेवाईक आहेत. त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा.
·
औषधांचे हिशेब व्यवस्थित ठेवा. कुणा औषधवाल्यांकडे तुमची
काही उधारी ठेवू नका.
·
डॉक्टरला फोन पाहिजे. माझ्या ओळखीचे एकजण आहेत, तुम्हाला
लगेच फोन मिळेल.
·
डॉक्टरला गाडी वापरली पाहिजे. सेकंडहॅण्ड का होईना एक
कार घेऊन टाका. डॉक्टरच्या दवाखान्याबाहेत त्याची कार असली की डॉक्टर चांगला असे
लोकांना वाटते.
यापैकी
जवळजवळ सर्व सूचना मी पाळल्या. त्याचा मला व्यवसायात खरंच उपयोग झाला. मेडिकल
कॉलेजमध्ये वर्गात सर्व पुस्तकातल्या आजारांचा परिचय होतो. त्यांचे उपचार समजतात.
कॉलेजच्या क्लिनिकल टर्म्समध्ये प्रत्यक्ष रुग्णाशी बोलणे आणि तपासणे होते. पण
व्यवसाय कसा करावा? रुग्णांच्या डॉक्टरांकडून काय अपेक्षा असतात, हे मला या
'गुरूंकडूनच' शिकायला मिळाले.
रुग्ण
तपासताना त्याचे म्हणणे नीट समजून घ्यावे लागते. आपल्या मनाने आधीच त्याचे निदान
पक्के करायचे नसते. नाहीतर गोंधळ झालाच म्हणून समजा. व्यवसायाच्या सुरुवातीला
घडलेला एक प्रसंग माझ्या मनावर याचे पक्के संस्कार करून गेला.
मी
दवाखाना सुरु केला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्या घराची बेल
वाजली. मी दार उघडले तर आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या एक गुजराथी महिला उभी होती.
त्यांचे नवीनच लग्न झाले होते आणि त्या गुजराथी मिश्रित मराठी बोलायच्या.
मी त्यांना आत बोलावले. " काय विशेष
एवढ्या सकाळ सकाळी?"
"हो ना. माझ्या मिस्टरना बरे नाही"
"हो? काय होतेय त्यांना?" मी
गडबडून विचारले.
"अरे, काल रात्रभर त्याला तरास
होतोय"
"कसला त्रास?"
"अरे, रातभर सारखा संडासला जातेय
तो?"
"अरे बापरे, किती वेळा गेला?"
"पन्नास-साठ वेळा तरी गेला असेल?"
बाईंचा स्वर खूप घाबरलेला वाटला.
"मग अॅडमिट करायचे का त्यांना?"
एवढे ५० जुलाब म्हणजे मला त्याचे डीहायड्रेशन दिसू लागले. यावर आपण काय करणार? असा
विचारही मनात डोकावून गेला.
" नको. तुम्हीच काही तरी द्या."
"त्यांना एक तर इथे घेऊन या नाही तर मला
घरी येऊन पाहावे लागेल त्यांना. त्यांना तपासावे लागेल, त्यांचे बीपी वगैरे पहावे
लागेल." माझ्यातला फिजिशियन बोलू लागला.
" खूप थकून गेलाय तो. तुम्ही औषध
द्या... नंतर जमलं तर आणते."
मी "ठीक आहे" म्हणालो आणि विचार
करू लगलो. त्याकाळी असे खूप जुलाब झाले की लोमोटील नावाच्या गोळ्या द्यायचे. असे
खूप जुलाब झाले की एका वेळेस २ गोळ्या आणि नंतर प्रत्येक जुलाबानंतर एक-एक अशा
जुलाब थांबेपर्यंत द्याव्या, असा संकेत होता. पण ५०-६० वेळा माणूस संडासला
गेलाय...म्हणून मी गोळ्या लिहून दिल्या आणि सांगितले,
"आत्ता २ गोळ्या आणि नंतर प्रत्येकवेळा
संडासला जाऊन आल्यावर एकेक.. असं बरं वाटेपर्यंत... पण तरी काही त्रास जास्त झाला
तर मला बोलवा नाहीतर उद्या घेऊन या"
बाईंनी प्रिस्क्रिप्शन घेतले आणि गेल्या.
साधारणतः तासाभराने त्यांच्या 'मिस्टर'ला
घेऊन त्या पुन्हा आल्या... त्या गृहस्थांना मराठी उत्तम येत होते. त्यांच्या
सौप्रमाणे गुजराथीमिश्रित नव्हते. त्यांना घरातल्या सोफ्यावर झोपवून तपासताना मी
विचारले, "फारच गळून गेलेले दिसताय. आता गेल्या तासाभरात किती जुलाब
झाले?"
हाताला बीपीचा पट्टा बांधलेल्या अवस्थेत
रुग्ण महाशय ताडकन उठून बसले. म्हणाले,
"जुलाब? अरे मला जुलाब नाही होत."
"मग? मला तर सांगितले की तुम्ही
रात्रभरात पन्नास-साठवेळा संडासला गेलात."
" अरे अविनाशभाई, मला कालपासून शौचाला
होत नव्हती. सारखं वाटायचं आली... म्हणून मी जात होतो. पण होत नव्हती. मला
कॉन्सटिपेशनचा त्रास आहे. दोन दिवस गावाला जाऊन आलो. उन्हात फिरलो. पाणी मिळाले
नाही. म्हणून संडासला त्रास होतोय."
हे ऐकल्यावर माझ्याच पोटात गोळा आला.... कारण
बाईने सांगितल्याप्रमाणे मी त्याला खूप जुलाब होतायत म्हणून औषध दिले होते. तरी मी
चेहऱ्यावर काही न दाखवता त्यांना परत झोपवले. त्यांचे बीपी बघितले. आणि बाईना
विचारले,
नकारात्मक मान हलवत त्या म्हणाल्या,
"दुकाने बंद होती. आता साडेनऊला उघडतील."
मी उसने अवसान आणत म्हणालो, "आता
तपासल्यावर माझ्या लक्षात आले की औषधे बदलावी लागतील."
मी आधीची चिट्ठी ताब्यात घेतली आणि नव्याने
"पोट साफ होण्याची औषधे लिहून दिली."
जाताना त्यांनी देऊ केलेली फी मी नाकारली.
म्हणालो, "अहो शेजारधर्म आहे हा. तुम्ही मला लहानपणापासून पाहताय.
तुमच्याकडून कशी फी घ्यायची?" मात्र मनात स्वतःशीच म्हणालो, "पेशंट
तपासताना त्याच्या तक्रारी नीट समजून घ्याव्यात. भाषेतला, भावनेतला गोंधळ करू नये.
हा धडा तुम्ही मला शिकवलात. त्याची गुरुदक्षिणा म्हणून मीच खरी तुम्हाला फी
द्यायला पाहिजे"
गेल्या पस्तीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये
माझ्या पेशंट्सने दिलेल्या अशा अनेक शिकवण्या आचरणात आणत माझी जडणघडण होत गेली हे
मी अनेकदा मान्य करतो.
-डॉ.अविनाश भोंडवे
(फॅमिली डॉक्टर)
Tuesday, June 4, 2019
रे फुला
नदी किनारी फिरत होतो...प्रवाह संथपणे वाहत होता..
कागद काटक्या पाने
प्रवाहाबरोबर तितक्याच संथपणे पुढे पुढे चालली होती...
एक फूल मला दिसले, सुकुमार, मोहक आणि नाजूक
तेही पाण्यावर तरंगत, डुलत झुलत पुढे जात होते..
किनाऱ्यावरून मी त्या फुलाला निरखत होतो...
अचानक पुढे एक भोवरा दिसला..
वेगवान
गर्रारा फिरणारा...
फूल त्या दिशेनेच सरकत होते..
काळजात चर्र झाले...
काय होणार त्या फुलाचे..
.
पुढे जाणार की त्या गर्तेत फिरत बुडून जाणार?
Monday, April 1, 2019
तुझी माझी रिलेशनशिप
प्रिय,
तुझी माझी रिलेशनशिप जन्मजन्मांतरीची आहे.
युगानुयुगे मी तुझ्या प्रेमपाशात शपथबद्ध आहे. एकापरीने आजकालची मुलेमुली म्हणतात, तसे आपले नाते म्हणजे एक 'लिव्ह-इन रिलेशनशिप'च म्हणायला हवी. तुझ्या माझ्या या
नात्यासाठी मी माझ्या लग्नाच्या बायकोची आणि मुलांची नेहमीच परवड केली. आपल्या
नातेसंबंधात मी एवढा बुडून गेलो होतो की त्यांच्याकडे लक्ष द्यायला कधी वेळ काढलाच
नाही.
मला
आठवतात अजूनही आपल्या नात्यातले ते सुरुवातीचे दिवस. मी तुझ्यासाठी काहीही करायला
तयार होतो. तुझ्याकडून होणाऱ्या माझ्या प्रशंसेने आसमंत व्यापून जायचा.
तुझ्याद्वारे क्षणोक्षणी होणारी माझी तारीफ, तुझ्या आयुष्यातले माझे मानाचे
उच्चस्थान, तुझ्याकडून मला हरघडी मिळणारा आदर, माझे मन तृप्त करायचा. मी होतो
प्राणरक्षक, मी होतो पुनर्जीवन दाता आणि हो 'देव'सुद्धा!!
आपले भारतीय म्हणजे कमालीचे सिनेमावेडे.
चित्रपटातील कुठल्याही प्रेमकथेत व्हिलन आल्याशिवाय त्यांना मजा येत नाही. अनेक
युगाब्द सुरळीतपणे चाललेल्या आपल्या प्रेमसंबंधातदेखील खलनायकांचा रीतसर प्रवेश
झाला. एक आला, दोन आले, एका पाठोपाठ किती आले, तुला आणि मला पत्ताच लागला नाही.
पाहता पाहता त्या खलनायकांच्या विषारी पाशात आपल्या रिलेशनशिपला ओहोटी लागली. यातले
काही खलनायक माझेच बांधव होते, काही माझे हितशत्रू होते आणि बाकीचे कायद्याचे
रक्षक होते.
माझ्याबाजूने मी अजूनही आपल्या नात्याबाबत
ठाम आहे, पण तुझ्या मनावर त्यांच्या खलवृत्तीचा पूर्ण प्रभाव पडल्याचे मला पदोपदी
जाणवत आहे. आजही मी वेड्यासारखा तुझ्यासाठी धावत आहे, पण तुला त्याचे काहीदेखील
सोयरसुतक नाही.
मी करत असलेल्या तुझ्या सेवेसाठी त्यांनी त्यांचे
मापदंड लावायला सुरुवात केली. 'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट'चा घाट घातला.
देशातल्या अनेक राज्यात तो तुला आणि मला न विचारता लागू करण्याचा प्रयत्न केला आणि
अजूनही तो निकराने चालूच आहे.
आपल्या नात्याला तोडू इच्छिणाऱ्या काही
कुऱ्हाडीच्या दांड्यांनी आपले संबंध केवळ आर्थिक आहेत असा शोध लावला. आपल्या
नात्यात कुठलीही सचोटी, प्रेम नाही असे ते सांगू लागले. तहानभूक विसरून, कडक थंडी
असो, मुसळधार पाऊस असो, रणरणते उन असो; तुझ्या हाकेला दिवसरात्रीची पर्वा न करता,
मी जी 'ओ' देत होतो, ती केवळ मूठभर पैशासाठीच असे ते घडोघडी जाहीर करू लागले. तुझी
मी करत असलेली निरलस सेवा ही मायेपोटी नसून 'माया' गोळा करण्यासाठी आहे, असा यांचा
दावा. मी तुझ्याकडे केवळ तुझ्या पैशांसाठीच येतो. तुला लुटतो आणि माझे उखळ पांढरे
करतो असे ते पुरावे गोळा करून सांगू लागले. मायबाप सरकारदेखील त्यांच्या बोळ्यानेच
दूध पिऊ लागले.
तुझी सेवा जास्त चांगली घडावी, तुझ्या
आयुष्यातली काळरात्र सरावी, आनंदाचा आरोग्याचा उदय व्हावा, म्हणून उत्तम आणि
ज्ञानीजनांच्या सेवामंदिरांचा मार्ग मी तुला दाखवतो, तो प्रत्येक वेळेस फक्त काही
'चवली-पावली' मिळावी म्हणूनच, असा जावईशोध आमच्याच वंशाच्या काही सज्जनांनी लावला.
आपल्या संबंधांवर हा कदाचित वर्मी बसणारा घाव असेल. अखेरचा नक्कीच नसेल, कारण असे
घाव दरदिवशी माझ्यावर पडतच आहेत. पण हा घाव म्हणजे आपले संबंध पूर्णपणे
'पैशाधिष्ठित' आहेत, असे कायदेशीरपणे बेमालूम सिद्ध करण्याचा आहे. हा वार माझ्यावर
केल्याने आपल्या संबंधांना कायमचे संपवल्याचा आसुरी आनंद या 'कर्मवीरांना' मायबाप
सरकारच्या आश्रयाखाली मिळणार आहे. 'कट प्रॅक्टिसविरोधी कायदा' असे गोंडस नाव देऊन
मला भयभीत करून आपल्या 'रिलेशनशिप'ला कायमचा 'ब्रेक' देण्याची ही आपल्या
मित्रांचीच खेळी आहे.
सध्या माझी मनःस्थिती फारच गंभीर आहे. "राजा
जागा रहा. रात्र वैऱ्याची आहे." हा संवाद आठवून माझी रोजची झोपच उडाली आहे.
तुझ्या सेवेचे उत्तुंग ध्येय ठेवून या पेशात आलो, रात्रंदिन मरणांसोबतच्या
युद्धाचे प्रसंग रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुझ्याकरिता लढलो; पण आता वाटते
बस्स!! कायमचे तोडून टाकावेत तुझे माझे संबंध आणि स्वस्थ घरी बसावे हरी हरी म्हणत.
गोळा करावे माझ्यासारखे दु:खी कष्टी आणि आम्हाला आदर्श मानून या रिलेशनशिपमध्ये
नव्याने अडकू इच्छिणारे. आयुष्याच्या करुण गर्तेत वेगाने फिरताना एका गाण्याचे
शब्द सतत आठवतात, 'अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली
पण प्रीती.'
शेवटी वाटते, जाऊ दे. भोळे सांब आहोत आपण.
आपली रिलेशनशिपची वाटच चुकली. डॉक्टर-पेशंट नात्याची ही या जगातली आणि या युगातली 'लिव्ह-इन
रिलेशनशिप' आपल्याला कळलीच नाही.
Labels:
Attack on Hospitals,
Avinash Bhondwe,
Doctor-Patient Relationship,
doctors,
Doctors image,
Healthworkers,
IMA,
Indian Doctors,
Violence against Doctors
Location:
Pune, Maharashtra, India
Wednesday, March 27, 2019
वाचवा उद्याची पिढी जंक फूडपासून
मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र
शासनाने राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात, शाळांच्या उपहारगृहात 'जंक फूड' दिले
जाऊ नये असे फर्मान काढले. दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भात मार्च २०१५ मध्ये
तसे स्पष्टपणे केंद्र सरकारला सुनावले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या
आरोग्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल म्हणून दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारने
त्याप्रमाणे एक आदेशही सर्व राज्य सरकारांना काढला होता. या आदेशांनुसार उशीरा का
होईना, पण ही पावले उचलली गेली.
महाराष्ट्र सरकारनंतर नागालँड सरकारनेदेखील याचप्रमाणे शाळेच्या परिसरात या
जंक फूडला बंदी घातली आणि इतर सरकारेही या पद्धतीचा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.
जंक फूड म्हणजे काय?
प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, ज्यांच्यात साखर, मीठ आणि स्निग्ध पदार्थ
म्हणजेच तेल, तूप, चरबी यांचे प्रमाण जास्त असते. या पदार्थांमध्ये भरपूर उष्मांक
असतात, पण पौष्टिकपणाबाबत पूर्ण ठणठणाट असतो.
·
स्टॉल किंवा हातगाडीवर सहज
मिळणारे पदार्थ- वेफर्स, पापडी, चिप्स, मसाला चिप्स
·
भारतीय पदार्थ- वडे, सामोसे, भजी, शेव, भेळ
·
आंतरराष्ट्रीय पदार्थ- पिझ्झा, बर्गर, डोनट
·
बेकरी प्रॉडक्ट्स- खारी, बिस्किट्स, बटर, टोस्ट्स, बनपाव
·
इतर- चॉकोलेट, केक्स, पेस्ट्री, लॉलीपॉप
या नियमामुळे तयार सरबते, बर्फाचे गोळे, कार्बोनेटेड तसेच नॉन-कार्बोनेटेड
शीतपेये, रसगुल्ला,
गुलाबजाम, पेढे, कलाकंद,
नूडल्स, पिझ्झा, बर्गर,
टिक्का, पाणीपुरी, गोळ्या आणि कँडी, जिलेबी, बुंदी,
इमरती,
चॉकलेट्स, मिठाया, केक आणि बिस्किटे, बन्स, पेस्ट्री, जाम आणि जेली या गोष्टी शाळांच्या
उपहारगृहातून हद्दपार होतील.
आजच्या
गतिमान जीवनात प्रत्येकाला दैनंदिन कामात कमालीची धावपळ करावी लागते. त्यात अनेक
कुटुंबांमध्ये नवराबायको दोघेही नोकरीला असतात आणि त्यामुळे घरच्याघरी रोजच
न्याहारी बनवण्याऐवजी काही तरी रेडीमेड गोष्ट खाण्यासाठी वापरण्याकडे कल वाढला
आहे. त्यामुळे मुलांना डब्यात भाजीपोळी देण्याऐवजी पॅटिस, पावभाजी किंवा वडापाव
दिला जातो. ही वस्तुस्थिती आहे. कित्येकदा आईवडील मुलांना डबा देण्याऐवजी, मधल्या
सुटीत असे जंक फूड खायला वरखर्च म्हणून पैसे देतात.
त्यात
पुन्हा टेलिव्हिजनवरील आकर्षक आणि फसव्या जाहिरातीमुळे पिझा, बर्गरसारखे
आंतरराष्ट्रीय पदार्थ खायला मुलेच नव्हे तर सारेच आबालवृद्ध प्रवृत्त होतात. या
साऱ्याचा परिपाक म्हणून, विशेषत: शहरी व
निमशहरी भागांतील बहुसंख्य लोक बरेच वेळा प्रक्रियाकृत, पॅकबंद व
ब्रँडेड अन्नपदार्थ (प्रोसेस्ड फूड) विकत घेऊ लागले आहेत.
प्रोसेस्ड फूड्स
प्रोसेस्ड फूड किंवा प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ
म्हणजे, अन्नपदार्थांवर खाद्यविषयक तंत्रज्ञानाचा वापर करून, ते जास्त टिकण्याच्या
आणि झटपट खाण्याच्या दृष्टीने बनवले जातात. उदाहरणार्थ रेडीमिक्स सूप, मॅगी,
चिकन-मटणाचे पदार्थ इ. त्याचप्रमाणे पास्ता, मिठाया, दुग्धजन्य पदार्थ (उदा. तयार
मसाला दूध, दही, लस्सी, पनीर ), बेकरीतले पदार्थ, कॉर्नफ्लेक्ससारखे न्याहारीचे
पदार्थ, डबाबंद अन्न पदार्थ (उदा. गुलाबजाम, रसगुल्ले, वाटाणा, फळे, फळांचे काप,
फळांचे गर इ.). मूळच्या अन्नपदार्थांवर यांत्रिकी आणि रासायनिक प्रक्रिया करून हे
झटपट पदार्थ बनत असल्याने ते नक्की महाग असतात.
अन्नावर प्रक्रिया करण्याची प्रमुख कारणे म्हणजे ते
टिकवणे, अतिरिक्त उत्पादन वाया
जाऊ न देणे, हंगाम गेल्यावरही ती फळे
अगर भाज्या उपलब्ध होणे अशी असतात. पापड, सांडगे, लोणची, मुरांबे यांना याप्रकारची घरगुती प्रक्रिया केली जाणारी
पारंपरिक उदाहरणे म्हणता येतील.
पण दूध, दही, फळे, भाजीपाला, मासे, चिकन-मटण, अनेक
कडधान्ये आणि शेंगभाज्या यांच्यावर प्रक्रिया करून विविध तयार डबाबंद अन्नपदार्थ
आता बनवले जातात. त्यांचा व्यापार हा आता हा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठाच
उद्योग झाला आहे.
कित्येक लोक एकावेळच्या किंवा दोन्ही वेळेच्या जेवणाऐवजी
प्रोसेस्ड अन्नपदार्थ खातात, तर काही सकाळच्या न्याहारीला किंवा इतर वेळेस स्नॅक्स
म्हणून खातात. या पदार्थामधून शरीराला मिळणारी पोषणमूल्ये अनेक गोष्टींवर अवलंबून
असतात. म्हणजे तो पदार्थ बनवताना तो
भाजून, आंबवून, अतिशीत करून, वाळवून अशाप्रकारच्या कुठल्या पद्धतीने बनवला आहे?
किंवा तो बनवताना त्यामध्ये मुळात नसलेल्या काही इतर अनैसर्गिक अन्नघटकांची भर
टाकली आहे का? हे घटक शरीराला किती फायदेशीर आहेत? तसंच ते खाणाऱ्याने किती वेळा
आणि किती प्रमाणात खाल्ले? पोषणमूल्यांसाठी या साऱ्या गोष्टींचा विचार करावा
लागतो.
जंक फूड्सचे तोटे
·
नाश्त्याचे पदार्थ- शहरी भागात
पाव, बिस्किटे, खारी, टोस्ट, बटर, केक्स, नानकटाई, कुकीज असे बेकरीतले पदार्थ आणि
चिप्स, कँडीज,चॉकलेट, पेपरमिंट असे निरर्थक पदार्थ खाल्ले जातात. यातून शरीराला
फक्त कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि साखर मिळते, परंतु त्यात असलेले रंग आणि इतर
रसायने शरीराला अपायकारक असतात.
·
इंस्टंट फूड- कॉर्नफ्लेक्स,
झटपट सूप, मॅगी, नूडल्स यात मोनोसोडियम ग्लुटामेट
नावाचा शरीराला हानिकारक क्षार असतो.यामुळे रक्तातील क्षारांचे प्रमाण वाढून
उच्चरक्तदाब, मूत्रपिंडांचे विकार होऊ शकतात.
·
फास्ट फूड- पिझा, बर्गर,
फ्राईड फिश, अशा पदार्थात अन्वश्यक चरबीयुक्त पदार्थ, क्षार असतात. त्यामुळे
उष्मांक वाढतात.
·
मिल्कशेक्स, सँडविच अशा पदार्थात
जंतूसंसर्ग होऊ शकतो.
·
डोसा, पावभाजी, पाणीपुरी, भेळ, वडापाव, भजी
अशा हातगाडीवर मिळणाऱ्या पदार्थात वापरले जाणारे पदार्थ म्हणजे, तेल, पीठ, मसाला
फारशा चांगल्या प्रतीचे नसतात. त्यामुळे उलट्या, जुलाब, अमांश, कावीळ, टायफॉइड असे
आजार सहजी होऊ शकतात.
·
वडे, भजी यासाठी वापरले जाणारे तेल दिवसभर
सतत उकळत असते, त्यामुळे रक्तदाब वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे असे त्रास होतात.
·
ज्यूस. बर्फाचे गोळे, सरबते, आईस्क्रीम्स,
कुल्फी अशा गोष्टींसाठी वापरला जाणारा बर्फ प्रमाणित नसतो आणि पाणी दूषित असा असते. त्यामुळे उलट्या-जुलाब, कावीळ,
विषमज्वर असे साथीचे
आजार पसरतात.
·
रस्त्यावर मिळणाऱ्या आणि उघड्यावर असलेल्या खाद्यपदार्थावर
रस्त्यावरची धूळ बसते. माशा बसत असतात, शिवाय ते पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीचे
आरोग्य शंकास्पद असते. साहजिकच रोगराईला ते आमंत्रण ठरते.
जीवनशैलीचे आजार
शाळेतील मुलांच्या आहारात अशी नि:सत्व आणि अपायकारक
खाद्ये आल्यावर त्यांचे आरोग्य बिघडतेच, पण या पदार्थात बहुतांशी स्निग्ध पदार्थ,
मीठ, इतर क्षार आणि कृत्रिम साखर यांची रेलचेल असते. त्यामुळे त्यांच्यात भरपूर
उष्मांक असतात. मात्र त्यात चोथायुक्त पदार्थ (फायबर), जीवनसत्वे आणि खनिजांचा
पूर्ण अभाव असतो.
यामुळे शालेय वयातच बेसुमार वजनवाढ होण्याची शक्यता
असते. या स्थूलपणामुळे या मुलांना त्यांच्या तारुण्यातच मधुमेह, उच्च रक्तदाब,
हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार असे जीवनशैलीशी निगडित दुर्धर आजार होतात, हे
संशोधकांनी दाखवून दिले आहे.
·
या पदार्थात 'फ्रुक्टोज' प्रकारची साखर
असल्याने हे पदार्थ खाल्ल्यावर आपले पोट भरले आहे आणि आपली भूक
भागली आहे अशी नैसर्गिक जाणीव होत नाही. साहजिकच हे पदार्थ वारेमाप प्रमाणात
खाल्ले जातात आणि वजनवाढ व इतर दोष निर्माण होतात.
·
या पदार्थात
प्रिझर्व्हेटिव्हज म्हणून तसेच रंग-वास-चव येण्यासाठी अनेक घातक कृत्रिम
रसायने वापरली जातात.
या रसायनांमुळे या अन्नपदार्थांचे व्यसन
लागते आणि मग भूक नसताना आणि शरीराला गरज नसताना ते खाल्ले जातात. रोजच्या आवश्यक भाजी-पोळी ऐवजी या
चटकदार पदार्थांवर ताव मारला जातो आणि आरोग्य ढासळते.
पोष्टिक पर्याय
राज्य शासनाने शाळांच्या कॅन्टीनमध्ये जंक
फूडऐवजी काय पदार्थ ठेवावेत, यासाठी
हैदराबादेच्या 'राष्ट्रीय आहार संस्थेची' मदत
घेऊन मुलांसाठी खास पौष्टिक मेनू ठेवावा आसे सुचवले आहे.
त्यामुळे आता शाळांच्या उपाहारगृहात, गव्हाची रोटी-पराठा, पालेभाज्यानी बनलेले पदार्थ, भात-भाजी,
पुलाव, डाळ, काळा चणा, गव्हाचा हलवा, गोड दलिया, नमकीन दलिया, राजमा,
कढी, उपमा, खिचडी, टोमॅटो, अंडी,
इडली-वडा सांबार, खीर-फिरनी, दूध आणि दुग्धजन्य दही-ताक, लस्सी, भाज्यांचा उपमा, भाज्यांचे सँडविच, भाज्यांची खिचडी, नारळाचे पाणी, शिकंजी,
जलजिरा इत्यादी पदार्थ
विक्रीसाठी ठेवावेत असा अध्यादेश शासनाने जारी केला आहे.
पर्यायी घरगुती पदार्थ
जंक फूड आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक अनर्थापासून उद्याच्या
पिढीला वाचवण्यासाठी केवळ शाळेत अशा पदार्थांवर बंदी येऊन भागणार नाही. त्याकरिता
दैनंदिन जीवनात मुलांना पर्यायी, आरोग्यवर्धक आणि खावासा वाटणारा कुठला खाऊ
द्यायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे.
याचे उत्तर आपल्या पारंपारिक न्याहारीच्या
पदार्थात तर आहेच, पण कित्येक आहार तज्ञांनी बनवलेल्या उत्तम पाककृतीतसुद्धा मिळू
शकेल. वानगी दाखल काही पदार्थ.
- परंपरागत खाद्य- पोहे, उपमा, शिरा, लापशी, खीर, शेवया, चिक्की, राजगिऱ्याचा लाडू, रेवडी, गोडी/गाठी शेव, इडली.
- वेगवेगळे लाडू- उदा. रव्याचा लाडू, बुंदीचा लाडू, बेसन लाडू, काजू-बदाम-खारीक-खोबरे यांचा लाडू, शेंगदाण्याचा लाडू, चपाती-गूळ-तूप यापासून बनवलेला लाडू.
- सलाड्स- मोड आलेल्या धान्यांची भेळ, फळांचे काप, काकड्या इ.
- तांदळाचे पदार्थ- पुदिना राईस, सोया फ्राईड राईस, अपल फ्राईड राईस, पनीर पुलाव, मेथी-पिज पुलाव, छोले बिर्याणी चना बिर्याणी इ.
- घरगुती चमचमीत/तळीव पदार्थ- भजी, वडे, शेव, पापड्या, कुरडया, पापड, करंज्या, पुऱ्या, शंकरपाळी, चकली, कडबोळी इ.
- घरगुती मिनी मील्स- अनेक प्रकारची व्हेज-नॉनव्हेज, सॅण्डविचेस, पोळीचे रोल, घावन, थालीपीठ, धिरडे, आंबोळ्या, अप्पम इ.
पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की तुमच्या हाताने बनलेले, घरातले
स्वच्छ पदार्थ वापरलेले पदार्थ तुमच्या कुटुंबाला जास्त निरामय ठेवतील.
एकविसाव्या शतकात यापुढे बहुसंख्य लोकांना घराबाहेर जास्त वेळ राहावं
लागणार आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले अन्न दिवसातून एकदा तरी खाण्याची वेळ
कदाचित प्रत्येकावर येईल. साहजिकच या अन्नाला पर्याय राहणार नाही. परंतु तरीसुद्धा
जर आरोग्याची डोळस जाणीव ठेवून या अन्नपदार्थांचे आवश्यक तेवढेच आणि मर्यादित सेवन
केले, आणि इतर वेळेस आरोग्याचे पालन करणारा चौरस आहार घेतला,तर कदाचित पुढील
पिढीवर होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी राहील
Labels:
Avinash Bhondwe,
Burger,
diseases,
Fast food,
Health,
Junk food,
Maggi,
Obesity,
PIZZA,
Pohe,
Processed food,
samosa,
Upma
Location:
Pune, Maharashtra, India
Subscribe to:
Comments (Atom)



जंक फूडची यादी तशी फार मोठी होईल, पण यात- 
