Wednesday, March 27, 2019

वाचवा उद्याची पिढी जंक फूडपासून



मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्र शासनाने राज्यातील सर्व शाळांच्या परिसरात, शाळांच्या उपहारगृहात 'जंक फूड' दिले जाऊ नये असे फर्मान काढले. दिल्ली उच्च न्यायालयाने यासंदर्भात मार्च २०१५ मध्ये तसे स्पष्टपणे केंद्र सरकारला सुनावले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने एक सकारात्मक पाऊल म्हणून दोन वर्षापूर्वी केंद्र सरकारने त्याप्रमाणे एक आदेशही सर्व राज्य सरकारांना काढला होता. या आदेशांनुसार उशीरा का होईना, पण ही पावले उचलली गेली.

महाराष्ट्र सरकारनंतर नागालँड सरकारनेदेखील याचप्रमाणे शाळेच्या परिसरात या जंक फूडला बंदी घातली आणि इतर सरकारेही या पद्धतीचा निर्णय घेतील अशी अपेक्षा आहे.

जंक फूड म्हणजे काय?

प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ, ज्यांच्यात साखर, मीठ आणि स्निग्ध पदार्थ म्हणजेच तेल, तूप, चरबी यांचे प्रमाण जास्त असते. या पदार्थांमध्ये भरपूर उष्मांक असतात, पण पौष्टिकपणाबाबत पूर्ण ठणठणाट असतो.

जंक फूडची यादी तशी फार मोठी होईल, पण यात- 

·         स्टॉल किंवा हातगाडीवर सहज मिळणारे पदार्थ- वेफर्स, पापडी, चिप्स, मसाला चिप्स

·         भारतीय पदार्थ- वडे, सामोसे, भजी, शेव, भेळ

·         आंतरराष्ट्रीय पदार्थ- पिझ्झा, बर्गर, डोनट

·         बेकरी प्रॉडक्ट्स- खारी, बिस्किट्स, बटर, टोस्ट्स, बनपाव

·         इतर- चॉकोलेट, केक्स, पेस्ट्री, लॉलीपॉप

या नियमामुळे तयार सरबते, बर्फाचे गोळे, कार्बोनेटेड तसेच नॉन-कार्बोनेटेड शीतपेये, रसगुल्ला, गुलाबजाम, पेढे, कलाकंद, नूडल्स, पिझ्झा, बर्गर, टिक्का, पाणीपुरी, गोळ्या आणि कँडी, जिलेबी, बुंदी,  इमरती, चॉकलेट्स, मिठाया, केक आणि बिस्किटे, बन्स, पेस्ट्री, जाम आणि जेली या गोष्टी शाळांच्या उपहारगृहातून हद्दपार होतील.

आजच्या गतिमान जीवनात प्रत्येकाला दैनंदिन कामात कमालीची धावपळ करावी लागते. त्यात अनेक कुटुंबांमध्ये नवराबायको दोघेही नोकरीला असतात आणि त्यामुळे घरच्याघरी रोजच न्याहारी बनवण्याऐवजी काही तरी रेडीमेड गोष्ट खाण्यासाठी वापरण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे मुलांना डब्यात भाजीपोळी देण्याऐवजी पॅटिस, पावभाजी किंवा वडापाव दिला जातो. ही वस्तुस्थिती आहे. कित्येकदा आईवडील मुलांना डबा देण्याऐवजी, मधल्या सुटीत असे जंक फूड खायला वरखर्च म्हणून पैसे देतात.

   त्यात पुन्हा टेलिव्हिजनवरील आकर्षक आणि फसव्या जाहिरातीमुळे पिझा, बर्गरसारखे आंतरराष्ट्रीय पदार्थ खायला मुलेच नव्हे तर सारेच आबालवृद्ध प्रवृत्त होतात. या साऱ्याचा परिपाक म्हणून, विशेषत: शहरी व निमशहरी भागांतील बहुसंख्य लोक बरेच वेळा प्रक्रियाकृत, पॅकबंद व ब्रँडेड अन्नपदार्थ (प्रोसेस्ड फूड) विकत घेऊ लागले आहेत.

प्रोसेस्ड फूड्स

प्रोसेस्ड फूड किंवा प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ म्हणजे, अन्नपदार्थांवर खाद्यविषयक तंत्रज्ञानाचा वापर करून, ते जास्त टिकण्याच्या आणि झटपट खाण्याच्या दृष्टीने बनवले जातात. उदाहरणार्थ रेडीमिक्स सूप, मॅगी, चिकन-मटणाचे पदार्थ इ. त्याचप्रमाणे पास्ता, मिठाया, दुग्धजन्य पदार्थ (उदा. तयार मसाला दूध, दही, लस्सी, पनीर ), बेकरीतले पदार्थ, कॉर्नफ्लेक्ससारखे न्याहारीचे पदार्थ, डबाबंद अन्न पदार्थ (उदा. गुलाबजाम, रसगुल्ले, वाटाणा, फळे, फळांचे काप, फळांचे गर इ.). मूळच्या अन्नपदार्थांवर यांत्रिकी आणि रासायनिक प्रक्रिया करून हे झटपट पदार्थ बनत असल्याने ते नक्की महाग असतात.

अन्नावर प्रक्रिया करण्याची प्रमुख कारणे म्हणजे ते टिकवणे, अतिरिक्त उत्पादन वाया जाऊ न देणे, हंगाम गेल्यावरही ती फळे अगर भाज्या उपलब्ध होणे अशी असतात. पापड, सांडगे, लोणची, मुरांबे यांना याप्रकारची घरगुती प्रक्रिया केली जाणारी पारंपरिक उदाहरणे म्हणता येतील.

पण दूध, दही, फळे, भाजीपाला, मासे, चिकन-मटण, अनेक कडधान्ये आणि शेंगभाज्या यांच्यावर प्रक्रिया करून विविध तयार डबाबंद अन्नपदार्थ आता बनवले जातात. त्यांचा व्यापार हा आता हा अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठाच उद्योग झाला आहे.

कित्येक लोक एकावेळच्या किंवा दोन्ही वेळेच्या जेवणाऐवजी प्रोसेस्ड अन्नपदार्थ खातात, तर काही सकाळच्या न्याहारीला किंवा इतर वेळेस स्नॅक्स म्हणून खातात. या पदार्थामधून शरीराला मिळणारी पोषणमूल्ये अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. म्हणजे  तो पदार्थ बनवताना तो भाजून, आंबवून, अतिशीत करून, वाळवून अशाप्रकारच्या कुठल्या पद्धतीने बनवला आहे? किंवा तो बनवताना त्यामध्ये मुळात नसलेल्या काही इतर अनैसर्गिक अन्नघटकांची भर टाकली आहे का? हे घटक शरीराला किती फायदेशीर आहेत? तसंच ते खाणाऱ्याने किती वेळा आणि किती प्रमाणात खाल्ले? पोषणमूल्यांसाठी या साऱ्या गोष्टींचा विचार करावा लागतो.

जंक फूड्सचे तोटे

·         नाश्त्याचे पदार्थ- शहरी भागात पाव, बिस्किटे, खारी, टोस्ट, बटर, केक्स, नानकटाई, कुकीज असे बेकरीतले पदार्थ आणि चिप्स, कँडीज,चॉकलेट, पेपरमिंट असे निरर्थक पदार्थ खाल्ले जातात. यातून शरीराला फक्त कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि साखर मिळते, परंतु त्यात असलेले रंग आणि इतर रसायने शरीराला अपायकारक असतात.

·         इंस्टंट फूड- कॉर्नफ्लेक्स, झटपट सूप, मॅगी, नूडल्स यात मोनोसोडियम ग्लुटामेट नावाचा शरीराला हानिकारक क्षार असतो.यामुळे रक्तातील क्षारांचे प्रमाण वाढून उच्चरक्तदाब, मूत्रपिंडांचे विकार होऊ शकतात.

·         फास्ट फूड- पिझा, बर्गर, फ्राईड फिश, अशा पदार्थात अन्वश्यक चरबीयुक्त पदार्थ, क्षार असतात. त्यामुळे उष्मांक वाढतात.

·         मिल्कशेक्स, सँडविच अशा पदार्थात जंतूसंसर्ग होऊ शकतो.

·         डोसा, पावभाजी, पाणीपुरी, भेळ, वडापाव, भजी अशा हातगाडीवर मिळणाऱ्या पदार्थात वापरले जाणारे पदार्थ म्हणजे, तेल, पीठ, मसाला फारशा चांगल्या प्रतीचे नसतात. त्यामुळे उलट्या, जुलाब, अमांश, कावीळ, टायफॉइड असे आजार सहजी होऊ शकतात.

·         वडे, भजी यासाठी वापरले जाणारे तेल दिवसभर सतत उकळत असते, त्यामुळे रक्तदाब वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे असे त्रास होतात.

·         ज्यूस. बर्फाचे गोळे, सरबते, आईस्क्रीम्स, कुल्फी अशा गोष्टींसाठी वापरला जाणारा बर्फ प्रमाणित नसतो आणि पाणी  दूषित असा असते. त्यामुळे उलट्या-जुलाब, कावीळ, विषमज्वर असे साथीचे आजार पसरतात.

·         रस्त्यावर मिळणाऱ्या आणि उघड्यावर असलेल्या खाद्यपदार्थावर रस्त्यावरची धूळ बसते. माशा बसत असतात, शिवाय ते पदार्थ बनविणाऱ्या व्यक्तीचे आरोग्य शंकास्पद असते. साहजिकच रोगराईला ते आमंत्रण ठरते.    

जीवनशैलीचे आजार

शाळेतील मुलांच्या आहारात अशी नि:सत्व आणि अपायकारक खाद्ये आल्यावर त्यांचे आरोग्य बिघडतेच, पण या पदार्थात बहुतांशी स्निग्ध पदार्थ, मीठ, इतर क्षार आणि कृत्रिम साखर यांची रेलचेल असते. त्यामुळे त्यांच्यात भरपूर उष्मांक असतात. मात्र त्यात चोथायुक्त पदार्थ (फायबर), जीवनसत्वे आणि खनिजांचा पूर्ण अभाव असतो.

यामुळे शालेय वयातच बेसुमार वजनवाढ होण्याची शक्यता असते. या स्थूलपणामुळे या मुलांना त्यांच्या तारुण्यातच मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार असे जीवनशैलीशी निगडित दुर्धर आजार होतात, हे संशोधकांनी दाखवून दिले आहे.

·         या पदार्थात 'फ्रुक्टोज' प्रकारची साखर असल्याने हे पदार्थ खाल्ल्यावर आपले पोट भरले आहे आणि आपली भूक भागली आहे अशी नैसर्गिक जाणीव होत नाही. साहजिकच हे पदार्थ वारेमाप प्रमाणात खाल्ले जातात आणि वजनवाढ व इतर दोष निर्माण होतात.

·         या पदार्थात प्रिझर्व्हेटिव्हज म्हणून तसेच रंग-वास-चव येण्यासाठी अनेक घातक कृत्रिम रसायने वापरली जातात. या रसायनांमुळे या अन्नपदार्थांचे व्यसन लागते आणि मग भूक नसताना आणि शरीराला गरज नसताना ते खाल्ले जातात. रोजच्या आवश्यक भाजी-पोळी ऐवजी या चटकदार पदार्थांवर ताव मारला जातो आणि आरोग्य ढासळते.

पोष्टिक पर्याय

राज्य शासनाने शाळांच्या कॅन्टीनमध्ये जंक फूडऐवजी काय पदार्थ ठेवावेत, यासाठी
हैदराबादेच्या 'राष्ट्रीय आहार संस्थेची' मदत घेऊन मुलांसाठी खास पौष्टिक मेनू ठेवावा आसे सुचवले आहे.

त्यामुळे आता शाळांच्या उपाहारगृहात, गव्हाची रोटी-पराठा, पालेभाज्यानी बनलेले पदार्थ, भात-भाजी, पुलाव, डाळ, काळा चणा, गव्हाचा हलवा, गोड दलिया, नमकीन दलिया, राजमा, कढी, उपमा, खिचडी,  टोमॅटो, अंडी, इडली-वडा सांबार, खीर-फिरनी, दूध आणि दुग्धजन्य दही-ताक, लस्सी, भाज्यांचा उपमा, भाज्यांचे सँडविच, भाज्यांची खिचडी, नारळाचे पाणी, शिकंजी, जलजिरा इत्यादी पदार्थ विक्रीसाठी ठेवावेत असा अध्यादेश शासनाने जारी केला आहे.

पर्यायी घरगुती पदार्थ

जंक फूड आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक अनर्थापासून उद्याच्या पिढीला वाचवण्यासाठी केवळ शाळेत अशा पदार्थांवर बंदी येऊन भागणार नाही. त्याकरिता दैनंदिन जीवनात मुलांना पर्यायी, आरोग्यवर्धक आणि खावासा वाटणारा कुठला खाऊ द्यायचा हा प्रश्न निर्माण होणार आहे.

याचे उत्तर आपल्या पारंपारिक न्याहारीच्या पदार्थात तर आहेच, पण कित्येक आहार तज्ञांनी बनवलेल्या उत्तम पाककृतीतसुद्धा मिळू शकेल. वानगी दाखल काही पदार्थ. 

  • परंपरागत खाद्य-  पोहे, उपमा, शिरा, लापशी, खीर, शेवया, चिक्की, राजगिऱ्याचा लाडू, रेवडी, गोडी/गाठी शेव, इडली.
  • वेगवेगळे लाडू- उदा. रव्याचा लाडू, बुंदीचा लाडू, बेसन लाडू, काजू-बदाम-खारीक-खोबरे यांचा लाडू, शेंगदाण्याचा लाडू, चपाती-गूळ-तूप यापासून बनवलेला लाडू.
  • सलाड्स- मोड आलेल्या धान्यांची भेळ, फळांचे काप, काकड्या इ.
  • तांदळाचे पदार्थ- पुदिना राईस, सोया फ्राईड राईस, अपल फ्राईड राईस, पनीर पुलाव, मेथी-पिज पुलाव, छोले बिर्याणी चना बिर्याणी इ.
  • घरगुती चमचमीत/तळीव पदार्थ- भजी, वडे, शेव, पापड्या, कुरडया, पापड, करंज्या, पुऱ्या, शंकरपाळी, चकली, कडबोळी इ.
  • घरगुती मिनी मील्स- अनेक प्रकारची व्हेज-नॉनव्हेज, सॅण्डविचेस, पोळीचे रोल, घावन, थालीपीठ, धिरडे, आंबोळ्या, अप्पम इ.

पालकांनी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी, की तुमच्या हाताने बनलेले, घरातले स्वच्छ पदार्थ वापरलेले पदार्थ तुमच्या कुटुंबाला जास्त निरामय ठेवतील.

एकविसाव्या शतकात यापुढे बहुसंख्य लोकांना घराबाहेर जास्त वेळ राहावं लागणार आहे. त्यामुळे प्रक्रिया केलेले अन्न दिवसातून एकदा तरी खाण्याची वेळ कदाचित प्रत्येकावर येईल. साहजिकच या अन्नाला पर्याय राहणार नाही. परंतु तरीसुद्धा जर आरोग्याची डोळस जाणीव ठेवून या अन्नपदार्थांचे आवश्यक तेवढेच आणि मर्यादित सेवन केले, आणि इतर वेळेस आरोग्याचे पालन करणारा चौरस आहार घेतला,तर कदाचित पुढील पिढीवर होणाऱ्या दुष्परिणामांची तीव्रता कमी राहील

 

No comments:

Post a Comment