Thursday, July 11, 2019

माझे पेशंट्स माझे गुरु




      १३ डिसेंबर १९८३ रोजी मला एम.बी.बी.एस.चे रजिस्ट्रेशन मिळाले आणि केवळ तीन आठवड्यातच म्हणजे ५ जानेवारी १९८५ ला मी माझ्या दवाखान्याचे उद्घाटन केले. मला मेरीटने मिळालेली पदव्युत्तर शिक्षणाची जागा मी घेतली नाही. आपण फॅमिली डॉक्टर म्हणूनच व्यवसाय करायचा हे मी पक्के ठरवले होते.
      डॉक्टरांना आपली जाहिरात करता येत नाही. जनसंपर्क आणि रुग्णांवर इलाज करताना आलेले यश यावरच त्याची प्रसिद्धी आपोआपच होत असते, हे मला पक्के माहिती होते. यालाच त्याकाळी 'या डॉक्टरांचा लगेच गुण येतो' असे म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे   उद्घाटनाच्याच्या आधी आठवडाभर मी आजूबाजूच्या सुमारे शंभर घरांमध्ये उद्घाटनानिमित्त ठेवलेल्या सत्यनारायण पूजेच्या तीर्थप्रसादाच्या निमंत्रण पत्रिका वाटल्या. 'निमंत्रण दिले की जायचेच' ही भावना त्याकाळी ठाम रुजलेली होती. साहजिकच हे सर्व लोक आठवणीने माझ्या उद्घाटनाला हजर होते. एवढे लोक येतील अशी माझ्या आई-वडिलांना कल्पना नव्हती. फारतर मित्र आणि नातेवाईक मिळून ५०-६० लोक येतील असे त्यांना वाटले होते. पण सुमारे ४००-४५० पाहुणे आल्याने तीर्थ आणि प्रसाद परत बनवावा लागला.
      या आलेल्या कुटुंबांपैकी जवळजवळ सर्व जण आजही संपर्कात आहेत. अधूनमधून का होईना ते माझ्याकडे सल्ला घ्यायला येतात. आजही दवाखान्यात नंबर लावून बसताना, "आम्ही डॉक्टरांचे पहिल्या दिवशीपासूनचे पेशंट्स" असे रिसेप्शनिस्टला आणि आजूबाजूला थांबलेल्या लोकांना अभिमानाने सांगतात. या साऱ्यांच्या प्रेमाने माझी प्रॅक्टिस पहिल्या सहा महिन्यातच खूप वाढली. आणि अनपेक्षितपणे मी शिवाजीनगर भागातील एक 'चांगला हातगुण असलेला डॉक्टर म्हणून अल्पावधीतच ओळखला जाऊ लागलो. 
      त्या ५ जानेवारीला तीर्थप्रसादाला आलेल्यांपैकी प्रत्येकाने माझी भेट घेऊन काही सूचना केल्या. काहींनी पुष्पगुच्छ दिले, काही जणांनी आहेरासारखी पाकिटे देऊ केली. (अर्थातच मी ती स्वीकारली नाहीत.) यामध्ये काही वडिलधाऱ्या व्यक्तींनी मनापासून केलेल्या सूचना अतिशय उपयुक्त ठरल्या. उदाहरणार्थ-
·         दवाखाना नऊला म्हणजे नऊलाच उघडला पाहिजे.
·         सुरुवातीला पेशंट्स नसले तरी पूर्णवेळ थांब. लोक जाता येता बघत असतात. दुपारी २ पर्यंत डॉक्टर असतो. मग वेळ आली की बरोबर आठवणीने येतात.
·         या भागातले दवाखाने रात्री नऊला बंद होतात, तुम्ही दहा पर्यंत थांबा
·         एखादी गरीब भिकारीण आली तरी तिला राणी असल्यासारखी वागवा. हे गरीबच आपले पेशंट्स असतात.
·         पैसे नसले तर औषध देऊ नका. त्या अमुक तमुक डॉक्टरकडे उधारी केलेल्या पाचशे जणांची यादी आहे. लोक उधारी ठेवतात आणि मग ती चुकवावी लागेल म्हणून डॉक्टर बदलतात.
·         कामाला माणसे जवळ राहणारी ठेवा. तुम्हाला उशीरा किंवा रात्री अपरात्रीपर्यंत दवाखाना चालू ठेवता येईल.
·         या भागात काही लोकांचे वर्चस्व आहे. त्यांचे खूप नातेवाईक आहेत. त्यांच्याशी संबंध चांगले ठेवा.
·         औषधांचे हिशेब व्यवस्थित ठेवा. कुणा औषधवाल्यांकडे तुमची काही उधारी ठेवू नका.
·         डॉक्टरला फोन पाहिजे. माझ्या ओळखीचे एकजण आहेत, तुम्हाला लगेच फोन मिळेल.
·         डॉक्टरला गाडी वापरली पाहिजे. सेकंडहॅण्ड का होईना एक कार घेऊन टाका. डॉक्टरच्या दवाखान्याबाहेत त्याची कार असली की डॉक्टर चांगला असे लोकांना वाटते.  
      यापैकी जवळजवळ सर्व सूचना मी पाळल्या. त्याचा मला व्यवसायात खरंच उपयोग झाला. मेडिकल कॉलेजमध्ये वर्गात सर्व पुस्तकातल्या आजारांचा परिचय होतो. त्यांचे उपचार समजतात. कॉलेजच्या क्लिनिकल टर्म्समध्ये प्रत्यक्ष रुग्णाशी बोलणे आणि तपासणे होते. पण व्यवसाय कसा करावा? रुग्णांच्या डॉक्टरांकडून काय अपेक्षा असतात, हे मला या 'गुरूंकडूनच' शिकायला मिळाले.
      रुग्ण तपासताना त्याचे म्हणणे नीट समजून घ्यावे लागते. आपल्या मनाने आधीच त्याचे निदान पक्के करायचे नसते. नाहीतर गोंधळ झालाच म्हणून समजा. व्यवसायाच्या सुरुवातीला घडलेला एक प्रसंग माझ्या मनावर याचे पक्के संस्कार करून गेला.
      मी दवाखाना सुरु केला त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता माझ्या घराची बेल वाजली. मी दार उघडले तर आमच्याच सोसायटीत राहणाऱ्या एक गुजराथी महिला उभी होती. त्यांचे नवीनच लग्न झाले होते आणि त्या गुजराथी मिश्रित मराठी बोलायच्या.
मी त्यांना आत बोलावले. " काय विशेष एवढ्या सकाळ सकाळी?"
"हो ना. माझ्या मिस्टरना बरे नाही"
"हो? काय होतेय त्यांना?" मी गडबडून विचारले.
"अरे, काल रात्रभर त्याला तरास होतोय"
"कसला त्रास?"
"अरे, रातभर सारखा संडासला जातेय तो?"
"अरे बापरे, किती वेळा गेला?"
"पन्नास-साठ वेळा तरी गेला असेल?" बाईंचा स्वर खूप घाबरलेला वाटला.
"मग अॅडमिट करायचे का त्यांना?" एवढे ५० जुलाब म्हणजे मला त्याचे डीहायड्रेशन दिसू लागले. यावर आपण काय करणार? असा विचारही मनात डोकावून गेला.
" नको. तुम्हीच काही तरी द्या."
"त्यांना एक तर इथे घेऊन या नाही तर मला घरी येऊन पाहावे लागेल त्यांना. त्यांना तपासावे लागेल, त्यांचे बीपी वगैरे पहावे लागेल." माझ्यातला फिजिशियन बोलू लागला.
" खूप थकून गेलाय तो. तुम्ही औषध द्या... नंतर जमलं तर आणते."
मी "ठीक आहे" म्हणालो आणि विचार करू लगलो. त्याकाळी असे खूप जुलाब झाले की लोमोटील नावाच्या गोळ्या द्यायचे. असे खूप जुलाब झाले की एका वेळेस २ गोळ्या आणि नंतर प्रत्येक जुलाबानंतर एक-एक अशा जुलाब थांबेपर्यंत द्याव्या, असा संकेत होता. पण ५०-६० वेळा माणूस संडासला गेलाय...म्हणून मी गोळ्या लिहून दिल्या आणि सांगितले,
"आत्ता २ गोळ्या आणि नंतर प्रत्येकवेळा संडासला जाऊन आल्यावर एकेक.. असं बरं वाटेपर्यंत... पण तरी काही त्रास जास्त झाला तर मला बोलवा नाहीतर उद्या घेऊन या"
बाईंनी प्रिस्क्रिप्शन घेतले आणि गेल्या.
साधारणतः तासाभराने त्यांच्या 'मिस्टर'ला घेऊन त्या पुन्हा आल्या... त्या गृहस्थांना मराठी उत्तम येत होते. त्यांच्या सौप्रमाणे गुजराथीमिश्रित नव्हते. त्यांना घरातल्या सोफ्यावर झोपवून तपासताना मी विचारले, "फारच गळून गेलेले दिसताय. आता गेल्या तासाभरात किती जुलाब झाले?"
हाताला बीपीचा पट्टा बांधलेल्या अवस्थेत रुग्ण महाशय ताडकन उठून बसले. म्हणाले,
"जुलाब? अरे मला जुलाब नाही होत."
"मग? मला तर सांगितले की तुम्ही रात्रभरात पन्नास-साठवेळा संडासला गेलात."
" अरे अविनाशभाई, मला कालपासून शौचाला होत नव्हती. सारखं वाटायचं आली... म्हणून मी जात होतो. पण होत नव्हती. मला कॉन्सटिपेशनचा त्रास आहे. दोन दिवस गावाला जाऊन आलो. उन्हात फिरलो. पाणी मिळाले नाही. म्हणून संडासला त्रास होतोय."
हे ऐकल्यावर माझ्याच पोटात गोळा आला.... कारण बाईने सांगितल्याप्रमाणे मी त्याला खूप जुलाब होतायत म्हणून औषध दिले होते. तरी मी चेहऱ्यावर काही न दाखवता त्यांना परत झोपवले. त्यांचे बीपी बघितले. आणि बाईना विचारले,
"मघाशी दिलेली औषधे घेतली का?"
नकारात्मक मान हलवत त्या म्हणाल्या, "दुकाने बंद होती. आता साडेनऊला उघडतील."
मी उसने अवसान आणत म्हणालो, "आता तपासल्यावर माझ्या लक्षात आले की औषधे बदलावी लागतील."
मी आधीची चिट्ठी ताब्यात घेतली आणि नव्याने "पोट साफ होण्याची औषधे लिहून दिली."
जाताना त्यांनी देऊ केलेली फी मी नाकारली. म्हणालो, "अहो शेजारधर्म आहे हा. तुम्ही मला लहानपणापासून पाहताय. तुमच्याकडून कशी फी घ्यायची?" मात्र मनात स्वतःशीच म्हणालो, "पेशंट तपासताना त्याच्या तक्रारी नीट समजून घ्याव्यात. भाषेतला, भावनेतला गोंधळ करू नये. हा धडा तुम्ही मला शिकवलात. त्याची गुरुदक्षिणा म्हणून मीच खरी तुम्हाला फी द्यायला पाहिजे"
गेल्या पस्तीस वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये माझ्या पेशंट्सने दिलेल्या अशा अनेक शिकवण्या आचरणात आणत माझी जडणघडण होत गेली हे मी अनेकदा मान्य करतो.   

-डॉ.अविनाश भोंडवे

(फॅमिली डॉक्टर)


  

Tuesday, June 4, 2019

रे फुला




नदी किनारी फिरत होतो...प्रवाह संथपणे वाहत होता..

कागद काटक्या पाने 

प्रवाहाबरोबर तितक्याच संथपणे पुढे पुढे चालली होती...
एक फूल मला दिसले, सुकुमार, मोहक आणि नाजूक

तेही पाण्यावर तरंगत, डुलत झुलत पुढे जात होते..

किनाऱ्यावरून मी त्या फुलाला निरखत होतो...

अचानक पुढे एक भोवरा दिसला..

वेगवान

गर्रारा फिरणारा...

फूल त्या दिशेनेच सरकत होते..

काळजात चर्र झाले...

काय होणार त्या फुलाचे..
.
पुढे जाणार की त्या गर्तेत फिरत बुडून जाणार?

Monday, April 1, 2019

तुझी माझी रिलेशनशिप

प्रिय,
      तुझी माझी रिलेशनशिप जन्मजन्मांतरीची आहे. युगानुयुगे मी तुझ्या प्रेमपाशात शपथबद्ध आहे. एकापरीने आजकालची मुलेमुली म्हणतात, तसे आपले नाते म्हणजे एक 'लिव्ह-इन रिलेशनशिप'च म्हणायला हवी. तुझ्या माझ्या या नात्यासाठी मी माझ्या लग्नाच्या बायकोची आणि मुलांची नेहमीच परवड केली. आपल्या नातेसंबंधात मी एवढा बुडून गेलो होतो की त्यांच्याकडे लक्ष द्यायला कधी वेळ काढलाच नाही.
       मला आठवतात अजूनही आपल्या नात्यातले ते सुरुवातीचे दिवस. मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार होतो. तुझ्याकडून होणाऱ्या माझ्या प्रशंसेने आसमंत व्यापून जायचा. तुझ्याद्वारे क्षणोक्षणी होणारी माझी तारीफ, तुझ्या आयुष्यातले माझे मानाचे उच्चस्थान, तुझ्याकडून मला हरघडी मिळणारा आदर, माझे मन तृप्त करायचा. मी होतो प्राणरक्षक, मी होतो पुनर्जीवन दाता आणि हो 'देव'सुद्धा!!
      आपले भारतीय म्हणजे कमालीचे सिनेमावेडे. चित्रपटातील कुठल्याही प्रेमकथेत व्हिलन आल्याशिवाय त्यांना मजा येत नाही. अनेक युगाब्द सुरळीतपणे चाललेल्या आपल्या प्रेमसंबंधातदेखील खलनायकांचा रीतसर प्रवेश झाला. एक आला, दोन आले, एका पाठोपाठ किती आले, तुला आणि मला पत्ताच लागला नाही. पाहता पाहता त्या खलनायकांच्या विषारी पाशात आपल्या रिलेशनशिपला ओहोटी लागली. यातले काही खलनायक माझेच बांधव होते, काही माझे हितशत्रू होते आणि बाकीचे कायद्याचे रक्षक होते.
      माझ्याबाजूने मी अजूनही आपल्या नात्याबाबत ठाम आहे, पण तुझ्या मनावर त्यांच्या खलवृत्तीचा पूर्ण प्रभाव पडल्याचे मला पदोपदी जाणवत आहे. आजही मी वेड्यासारखा तुझ्यासाठी धावत आहे, पण तुला त्याचे काहीदेखील सोयरसुतक नाही.
     
आपल्या संबंधांवर पहिला हल्ला झाला, त्यात मी तुझ्या तब्येतीची बिलकुल पर्वा करत नाही, असे या रक्षकांनी ठरवले. आपल्या नातेसंबंधांना पूर्ण कात्री लावून, तू माझे गिऱ्हाईक आहेस आणि मी दुकानदार असे जाहीर केले. आपले नाते 'कन्झ्युमर प्रोटेक्शन अॅक्ट'च्या कक्षेने काबीज केले.
      मी करत असलेल्या तुझ्या सेवेसाठी त्यांनी त्यांचे मापदंड लावायला सुरुवात केली. 'क्लिनिकल एस्टॅब्लिशमेंट अॅक्ट'चा घाट घातला. देशातल्या अनेक राज्यात तो तुला आणि मला न विचारता लागू करण्याचा प्रयत्न केला आणि अजूनही तो निकराने चालूच आहे.
      आपल्या नात्याला तोडू इच्छिणाऱ्या काही कुऱ्हाडीच्या दांड्यांनी आपले संबंध केवळ आर्थिक आहेत असा शोध लावला. आपल्या नात्यात कुठलीही सचोटी, प्रेम नाही असे ते सांगू लागले. तहानभूक विसरून, कडक थंडी असो, मुसळधार पाऊस असो, रणरणते उन असो; तुझ्या हाकेला दिवसरात्रीची पर्वा न करता, मी जी 'ओ' देत होतो, ती केवळ मूठभर पैशासाठीच असे ते घडोघडी जाहीर करू लागले. तुझी मी करत असलेली निरलस सेवा ही मायेपोटी नसून 'माया' गोळा करण्यासाठी आहे, असा यांचा दावा. मी तुझ्याकडे केवळ तुझ्या पैशांसाठीच येतो. तुला लुटतो आणि माझे उखळ पांढरे करतो असे ते पुरावे गोळा करून सांगू लागले. मायबाप सरकारदेखील त्यांच्या बोळ्यानेच दूध पिऊ लागले.
      तुझी सेवा जास्त चांगली घडावी, तुझ्या आयुष्यातली काळरात्र सरावी, आनंदाचा आरोग्याचा उदय व्हावा, म्हणून उत्तम आणि ज्ञानीजनांच्या सेवामंदिरांचा मार्ग मी तुला दाखवतो, तो प्रत्येक वेळेस फक्त काही 'चवली-पावली' मिळावी म्हणूनच, असा जावईशोध आमच्याच वंशाच्या काही सज्जनांनी लावला. आपल्या संबंधांवर हा कदाचित वर्मी बसणारा घाव असेल. अखेरचा नक्कीच नसेल, कारण असे घाव दरदिवशी माझ्यावर पडतच आहेत. पण हा घाव म्हणजे आपले संबंध पूर्णपणे 'पैशाधिष्ठित' आहेत, असे कायदेशीरपणे बेमालूम सिद्ध करण्याचा आहे. हा वार माझ्यावर केल्याने आपल्या संबंधांना कायमचे संपवल्याचा आसुरी आनंद या 'कर्मवीरांना' मायबाप सरकारच्या आश्रयाखाली मिळणार आहे. 'कट प्रॅक्टिसविरोधी कायदा' असे गोंडस नाव देऊन मला भयभीत करून आपल्या 'रिलेशनशिप'ला कायमचा 'ब्रेक' देण्याची ही आपल्या मित्रांचीच खेळी आहे.
      सध्या माझी मनःस्थिती फारच गंभीर आहे. "राजा जागा रहा. रात्र वैऱ्याची आहे." हा संवाद आठवून माझी रोजची झोपच उडाली आहे. तुझ्या सेवेचे उत्तुंग ध्येय ठेवून या पेशात आलो, रात्रंदिन मरणांसोबतच्या युद्धाचे प्रसंग रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत तुझ्याकरिता लढलो; पण आता वाटते बस्स!! कायमचे तोडून टाकावेत तुझे माझे संबंध आणि स्वस्थ घरी बसावे हरी हरी म्हणत. गोळा करावे माझ्यासारखे दु:खी कष्टी आणि आम्हाला आदर्श मानून या रिलेशनशिपमध्ये नव्याने अडकू इच्छिणारे. आयुष्याच्या करुण गर्तेत वेगाने फिरताना एका गाण्याचे शब्द सतत आठवतात, 'अखेरचे येतील माझ्या हेच शब्द ओठी, लाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती.'  

      शेवटी वाटते, जाऊ दे. भोळे सांब आहोत आपण. आपली रिलेशनशिपची वाटच चुकली. डॉक्टर-पेशंट नात्याची ही या जगातली आणि या युगातली 'लिव्ह-इन रिलेशनशिप' आपल्याला कळलीच नाही.