मन करा रे प्रसन्न । सर्व सिद्धीचें कारण ।मोक्ष अथवा बंधन । सुख समाधान इच्छा ते ।।१।।
मनें प्रतिमा स्थापिली । मनें मना पूजा केली ।
मनें इच्छा पुरविली । मना माउली सकळांची ।।२।।
मन गुरु आणि शिष्य । करि आपुलेंचि दास्य ।
प्रसन्न आपआपणास । गति अथवा अधोगती ।।३।।
साधक वाचक पंडित । श्रोते वक्ते ऐका मात ।
नाहीं नाहीं आन दैवत । "तुका" म्हणे दुसरें ।।४।।
~ संत तुकाराम