Sunday, March 15, 2020

डॉ.ह.वि.सरदेसाई: आदर्श डॉक्टर, डॉक्टरांचे आदर्श


डॉक्टर तुम्हाला पाहिलं की निम्मा आजार दूर होतो’, असं बऱ्याचदा रुग्ण आपल्या डॉक्टरांना म्हणतात. पण ज्यांना नुसते पाहिल्यावर निम्माच काय साराच आजार पळून जातो, असं रुग्णांना निश्चित वाटतं, असे धन्वंतरी म्हणजे विख्यात फिजिशियन डॉ. .वि.सरदेसाई! १९६० सालापासून आजपावेतो म्हणजे एका अर्धशतकाहूनही चार वर्षे अधिक काळ, केवळ पुण्यातीलच नव्हे तर दूरदूरच्या गावातून येणारे रुग्ण या साक्षात्काराचा अनुभव घेत आहेत.गेल्या चोपन्न वर्षात कित्येक रुग्णांच्या पाच पिढ्यांना त्यांनी आपली सेवा पुरविली आहे. 



गोरापान रंग, रुग्णांना आश्वासक वाटणारं प्रसन्न स्मितहास्य, नजरेमधील अपरंपार प्रेमळपणा, अपरंपार उल्हासान ओसंडून वाहणारी देहबोली, पाहताच रुग्णांचंच काय पण आजूबाजूच्या इतर डॉक्टरांचं, विद्यार्थ्याचं मन एका चैतन्यानं भरून जातं. डॉ..वि.सरदेसाईंचे व्यक्तिमत्व, त्यांची वैद्यकीय सेवेची पद्धत, त्यांची जीवनशैली, व्यावसायिक नैतिकता  आणि त्यांचे आरोग्यविषयक वैद्यकीय विचार हे सारे रुग्णांना, साऱ्या डॉक्टर वर्गाला आणि संपूर्ण   समाजाला एक अनन्यसाधारण आदर्श आहेत.
आलेल्या प्रत्येक रुग्णाच्या आजाराचा इत्थंभूत वैद्यकीय इतिहास विचारून, आवश्यक त्या शारीरिक चाचण्या करून, डॉ.सरदेसाईंचे रुग्णाला दिले जाणारे प्रिस्क्रिप्शन म्हणजे एक देखणे लेणे असते. पांढऱ्या स्वच्छ लेटरहेडवर, अत्यंत सुवाच्य अशा अक्षरात, नजरेत भरणाऱ्या दिमाखदार मोरपंखी शाईत ते लिहितात. प्रिस्क्रिप्शनवर रुग्णाचे नांव ते शुद्ध मराठीमध्ये म्हणजे देवनागरी लिपीत लिहितात. विशेष म्हणजे त्यावर इंग्रजी दिनांक न टाकताश्रावण शुद्ध ७,शके १९३५अशी मराठी तिथी लिहितात. प्रत्येक औषधाखाली रुग्णाला समजेल अशा पद्धतीने, ते कसे कसे घ्यावे हे मराठीत विषद केलेले असते. त्यानंतर त्याने करावयाचे व्यायाम आणि पथ्ये नमूद करून चिट्ठीच्या शेवटीहणमंत वि.सरदेसाईअशी मराठीमध्ये स्वाक्षरी असते.
आजूबाजूचे एकूण एक वैद्यकीय व्यावसायिक इंग्रजीमधून प्रिस्क्रिप्शन लिहीत असताना तुम्ही मराठीतच का लिहिता असे विचारल्यावर ते म्हणतात,  माझ्या पेशंट्समध्ये मराठी न समजणारे लोक एक टक्कासुद्धा नाहीत, मग मी ते मराठीतूनच का लिहू नये? आजही खेड्यापाड्यातील बहुसंख्य लोक मराठी दिनदर्शिकेचा वापर करतात.चिठ्ठीवरचे माझे वळणदार अक्षर माझ्या पेशंट्सना माझ्या सूचना समजायला सोप्या पडतात.” वैद्यकीय प्रिस्क्रिप्शन कसे असावे आणि कसे लिहावे याचा एक आगळा वेगळा आदर्श नमुना म्हणून आजही त्यांची वाखाणणी होते.
साऱ्या जगाला आरोग्याचा सल्ला देणाऱ्या वैद्यकीय व्यावसायिकाची स्वतःची जीवनशैलीदेखील आरोग्य जोपासणारी हवी, हे डॉ.सरदेसाईंनी अनेक वर्षे नित्यनियमाने जोपासलेल्या त्यांच्या स्वतःच्या दिनक्रमाने दाखवून दिले आहे. रात्री नऊ वाजता झोपणे, पहाटे साडेतीनला उठणे, त्यानंतर १०८ सूर्यनमस्कार घालणे हे त्यांनी तीस-चाळीस वर्षे पाळले. दवाखान्याच्या वेळा, जहांगीर हॉस्पिटल, ससून हॉस्पिटल या इस्पितळातल्या त्यांच्या राउंडस, बी,जे.मेडिकल कॉलेजमधील त्यांची विद्यार्थ्यांसाठी व्याख्याने, इतर सामाजिक कार्ये आणि विविध वैद्यकीय विषयावरील जाहीर सभेतील त्यांची भाषणे या साऱ्या व्यापात त्यांनी स्वतःच्या आरोग्यासाठी खाण्यापिण्याच्या वेळा, व्यायाम, विश्रांती, वाचन-लेखन-मनन-चिंतन हे सारे त्यांनी काटेकोरपणे पाळले. आपल्या कामाच्या पसाऱ्यात आणि पैशापाठी धावताना आपल्या आरोग्याचे मातेरे करून घेणाऱ्या, आमच्या आजच्या पिढीच्या डॉक्टरांना आणि इतर व्यावसायिकांना यातली कुठलीच गोष्ट नीट जमत नाही. यादृष्टीने या सगळ्यांनाच त्यांची जीवनशैली ललामभूत ठरावी.

आजच्या जगात स्वतःचा व्यवसाय उत्तम चालला असेल तर सामाजिक बांधिलकी मानून आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्यांचा सर्व समाजाला फायदा व्हावा यासाठी काही करण्यास डॉक्टरांना तसेच इतर व्यावसायिकांना रस नसतो.  बरेवाईट स्वार्थी उपक्रम  करून अधिकाधिक पैसा मिळवणे आणि काहीतरी करून सेलेब्रिटी होणे याकरिता करण्याकडे अनेकांचा कल आहे. अशावेळी वैद्यकीय व्यवसाय उत्तम प्रकारे सुरू असतानाजे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी शिकवावे, शहाणे करून सोडावे, सकळ जन I’ या रामदासी उक्तीप्रमाणे डॉ..वि.सरदेसाईंनी कुठल्याही आर्थिक मोबदल्याची अपेक्षा न ठेवता, आरोग्य, व्यायाम, योग, मनःशांती अशा हजारो विषयांवर अगणित व्याख्याने दिली.
त्यांचे पहिले व्याख्यान १९६१ साली वसंत व्याख्यानमालेत झाले. त्यावेळेस  पुण्यातील नामवंत एका डॉक्टरांनी त्यांना बोलावून सांगितले की, “तुम्ही ते व्याख्यान देऊ नका. तिथे असे अनेक लोक येतील, तुम्हाला वेगवेगळे प्रश्न विचारून भंडावून सोडतील आणि तुमची हुर्यो करतील, तुम्हाला पळवून लावतील.” प्रसंग मोठा बाका होता,पण तरीही स्वतःच्या ज्ञानावर आणि अभ्यासावर असलेला विश्वास आणि ठाम निश्चय यांना शिरोधार्य मानून त्यांनी ते निमंत्रण स्वीकारले. त्या दिवशी त्यांचे ते व्याख्यान सर्व श्रोत्यांना विलक्षण आवडले. त्या काळात आरोग्याबाबतीतील अशास्त्रीय समजुतींचा पगडा आपल्या लोकांवर खूप होता, आजही तो काही अंशाने आहे. अशा जाहीर भाषणामुळे लोकांचे प्रबोधन आपण आपल्या भाषणातून, वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांमधील लेखांतून, आरोग्यावरील विविध पुस्तकांतून करावा या त्यांच्या निश्र्चयाला चालना मिळाली. आरोग्याबाबत विचारपरिवर्तनाचं त्यांचं हे कार्य वैद्यकीय सेवेसमवेत आजतागायत चालू आहे.
डॉ..वि.सरदेसाईंच्या जाहीर व्याख्यानांप्रमाणेच त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी ते घेत असलेल्या    न्यूरॉलोजीविषयक व्याख्यानांच्या  मालिकांची आठवण आज नामवंत वैद्यकीय तज्ञ म्हणून ओळखले जाणारे त्यांचे अनेक विद्यार्थी काढतात. ही व्याख्याने सकाळी सात वाजता व्हायची, तन्मयतेने आणि पूर्ण एकाग्रतेने ऐकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जथ्याने बी.जे.मेडिकल कॉलेजच्या वर्गाबाहेरील पॅसेजेससुद्धा त्यावेळी ओसंडून वाहायची. 
वैद्यकीय विषयावरील व्याख्यानांबरोबरच त्यांनी  अनेक वैद्यकीय विषयांवर लेख आणि पुस्तके लिहिली. वैद्यकीय विषय सोडता ते कधीही इतर विषयांवर बोलत नाहीत आणि अशा गोष्टींवर कुठलेही मतप्रदर्शन करीत नाहीत. लिखाणसुद्धा ते फक्त वैद्यकीय विषयांवरच करतात. “ज्या विषयात माझा अभ्यास आहे, ज्ञान आहे, अधिकार आहे त्यावरच आपण बोलावे आणि लिहावे, हे तत्व म्हणून मी पाळत आलो आहे.” असे ते नेहमी म्हणतात. ‘घरोघरी ज्ञानेश्वर जन्मतीया बालसंगोपनाच्या  विषयावरील त्यांचं भाषण, किर्लोस्करांनी ऐकल्यावर या विषयांवर लेखमाला त्यांनी किर्लोस्कर मासिकात छापली. ती खूप लोकप्रिय झाली. त्याचेच नंतर पुस्तक झाले आणि तेदेखील खूपच प्रसिद्ध झाले. त्यानंतर आजपावेतो त्यांनी सत्तावीस पुस्तके लिहिली आहेत. त्यामध्ये शारीरिक व मानसिक व्यायाम,पथ्य,आहार,स्वच्छता, औषधांचे गुणधर्म अशा अनेकविध विषयावरील पुस्तकांचा समावेश आहे.
त्यांची पुस्तके वाचून असंख्य वाचकांनी त्यांच्या ज्ञानात भर पडल्याचे तर सांगितलेच ,पण त्यांच्या आरोग्यविषयक दृष्टिकोनातसुद्धा फरक झाल्याचे सांगितले आहे.आजदेखील त्यांच्या एखाद्या नियतकालिकेत आलेल्या लेखाबद्दल अनेक रुग्ण त्यांना  फोन करतात, दवाखान्यात येऊन सांगतात. त्यांच्याकडे त्या पुस्तकांची विचारणा करून ती आवर्जून वाचतात. “ही सारी पुस्तके लिहिताना मला त्या विषयाचे सखोल वाचन करावे लागते, संदर्भ ग्रंथ चाळावे लागतात. या लेखनाच्या निमित्ताने माझा त्या विषयाचा पुन्हा अभ्यास होतो आणि मला त्यात खरोखरी आनंद मिळतोअसे ते आवर्जून सांगतात.
१९५८ साली एम्.डी.ची परीक्षा उत्तीर्ण होऊन ते एम्.आर.सी.पी.करण्यासाठी इंग्लंडला गेले. मेंदूचे विकार (न्युरॉलोजी) हा त्यांचा  अभ्यासाचा विषय असल्यामुळे त्यांना  एडिंबराला जावे लागले. या परीक्षेचा अभ्यासक्रम पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की त्यांचा हा विषय पूर्ण तयार आहे आणि या विषयातले सर्व मूलभूत तसेच प्रगत ज्ञान त्यांना  आहे. प्रत्येक बारीक सारीक तपशीलांवर, विस्तृत अभ्यास करून त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना व्याख्यानेदेखील दिली होती. त्यामुळे केवळ सहा आठवड्यातच या तयारीवर त्यांनी ही परीक्षा दिली आणि सहजरीत्या ते एम्.आर.सी.पी. उत्तीर्ण झाले.
'तारुण्याच्या उंबरठ्यावर' या 
माझ्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात     
एम्.आर.सी.पी.च्या परीक्षेमधील त्यांचा एक अनुभव विलक्षण आहे. एका रुग्णाचे, त्याच्याशी आजाराविषयी बोलून, माहिती विचारून, त्याच्या आजाराचे परीक्षण करून, परीक्षकांना ते सादर करायचे, आणि मग त्यावरील प्रश्नोत्तरांना सामोरे जायचे, अशी पद्धत वैद्यकीय परीक्षेत असते.त्यांना तपासण्यासाठी एक रुग्ण दिला गेला. त्यांनी त्या रुग्णाशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला, पण त्याचे स्कॉटिश उच्चार यांना कळेनात आणि यांचे भारतीय पद्धतीचे इंग्रजी उच्चार त्याला समजेनात. त्यामुळे त्याच्या आजाराविषयी काहीच माहिती डॉ.सरदेसाईंना कळत नव्हती. शेवटी परीक्षक आले. त्यांना डॉक्टरांनी स्वच्छ सांगितले की, “मला रुग्णाच्या आजाराचा इतिहास समजत नाहीये”. त्यावर त्याने ती अडचण मान्य केली आणि त्या रुग्णाच्या हाताचा एक्सरे दाखवला. त्यावर डॉ.सरदेसाईंनी सांगितले, ”माझ्या देशात, जर भारतीय माणसाचा असा एक्सरे मी पाहिला असता, तर तो कुष्ठ रोगाचा आहे असे मी सांगितले असते; पण ब्रिटनमध्ये हा आजार अत्यंत दुर्मिळ आहे.”
त्या परीक्षकाने त्यांची पाठ थोपटली आणि अभिनंदन केले. त्यांची  अडचण समजून घेऊन त्यांच्या सर्वांगीण  ज्ञानावर त्यांने परीक्षा केली आणि त्यांना  उत्तीर्ण केले..“रॉयल कॉलेजच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्ञानावर जगभर ओळखले जाते. एखादा विद्यार्थी परीक्षेत जरी अनुत्तीर्ण झाला, तरी इथे त्याने मिळवलेल्या त्याच्या ज्ञानावर तो पुढे निश्चितच यशस्वी होईल!” तिथल्या पदवीदान समारंभातसुद्धा सांगितलेले हे शब्द डॉ.सरदेसाईंना अजूनही आठवतात
इंग्लंडमधल्या वैद्यकीय शिक्षणाच्या पद्धतीतून धडे घेऊन आपल्याकडे सुधारणा व्हायला हवी असे डॉ..वि.सरदेसाईंना सतत वाटत आले आहे. १९७२-७३ साली ते पुणे विद्यापीठाच्या एम्.डी.परीक्षेसाठी परीक्षक म्हणून नियुक्त झाले. परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना नेमके काय काय शिकवायचे असते? हा प्रश्न त्यांना पडला. याकरिता विद्यापीठाला पत्र पाठवून विचारणा केली, तर एक चार ओळींचे उत्तर आले. त्यात फक्त विद्यार्थ्यांची बारा व्याख्याने घ्यावीत, एवढाच उल्लेख होता. काही तरी वेगळे करावे, या उद्देशाने त्यांनी मग मुंबई, दिल्ली अशा जुन्या नामांकित बाहेरील विद्यापीठांशीदेखील पत्र-व्यवहार केला; परंतु त्या ठिकाणांहूनसुद्धा तशीच चार ओळीची उत्तरे आली. त्यांच्या लक्षात आले की ब्रिटिशांनी भारतात वैद्यकीय शिक्षण सुरू केले त्यानंतरच्या पन्नास वर्षात वैद्यकीय अभ्यासक्रम बदलावा, त्यात काही भारतीय रुग्णाच्या विचाराने बदल करावा असा विचारच आपल्या देशात झाला नव्हता. त्याउलट त्याच ब्रिटिशांनी त्यांच्या देशात मात्र दर दहा वर्षांनी तिथल्या अभ्यासक्रमात सतत नावीन्यपूर्ण सुधारणा केल्या आहेत.
वैद्यकीय शिक्षणाबाबत डॉ.सरदेसाई म्हणतात, “आपल्या भारतीय लोकांना कशा प्रकाराच्या वैद्यकीय सेवेची गरज आहे, कुठले वैद्यकीय ज्ञान असणे आवश्यक आहे, कसा डॉक्टर त्यांना हवा आहे याचे एक व्यापक सर्वेक्षण व्हायला हवे. त्याप्रमाणे आपला वैद्यकीय अभ्यासक्रम बदलायला हवा. आपले वैद्यकीय शिक्षण हे रुग्णाभिमुख असायला पाहिजे असा माझा ठाम विश्वास आहे. याकरता विद्यार्थ्यांना पहिल्या वर्षात आयुर्वेद,योगासने,होमिओपाथी, लोकांशी सुसंवाद कसा साधावा याचे ज्ञान देणे आवश्यक आहे. कारण व्यवसाय करताना, जेंव्हा रुग्ण डॉक्टरांना विचारतो की, “पेरू थंड असतो की उष्ण?” आणि डॉक्टर काहीच उत्तर देऊ शकत नाही. किंवा काही रुग्ण म्हणतात, “ माझा वरचा श्वास वर राहतो आणि खालचा खाली.” अशावेळेस रुग्णाला नक्की काय म्हणायचेय? त्याला नक्की काय त्रास होतो आहे, हे डॉक्टरांना कळायला हवे. अजूनही आपली बहुसंख्य जनता अगदी उच्च शिक्षित लोकदेखील अशाप्रकारे विचार करतात आणि डॉक्टर नेहमीच त्यावर अडखळतात. त्यामुळे याप्रकारचे आयुर्वेदाचे प्राथमिक ज्ञान त्यांना असणे आवश्यक आहे आणि ते वैद्यकीय शिक्षणातच द्यायला हवे.
काही विशिष्ट आजारात होमिओपथीचा विलक्षण उपयोग होऊ शकतो हे मी स्वतः पाहिले आहे. त्यामुळे त्या शास्त्राचेसुद्धा ज्ञान विद्यार्थ्यांना हवे आहे. फक्त माझीच शाखा सर्वश्रेष्ठ आहे असा दुराभिमान बाळगून, डोळ्यांवर पट्टी बांधणे चुकीचे आहे, असे मला मनापासून वाटते. वैद्यकीय शिक्षणाच्या पुढच्या वर्षांमध्ये वेगवेगळ्या विषयांचे आवश्यक आणि व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांना मिळावे. पदवी मिळाल्यानंतर त्याच्या आवडीच्या विषयात त्याला पदव्युत्तर आणि त्यापुढचे अतिप्रगत ज्ञान त्याला सहज घेता यायला हवे. असे घडल्यास आपल्या वैद्यकीय सेवेत निश्चितच सुधारणा होईल आणि रुग्णांना त्याचं लाभ होईल.” या अशा प्रकारच्या सूचना त्यांनी पुणे विद्यापीठाला लिहून पाठवल्या होत्या, पण त्याचा बहुधा विचार झाला नाही.
डॉ..वि.सरदेसाईंच्या पत्नी डॉ. सौ. कुंदा या पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि सुरुवातीपासूनच, त्यांच्या  सर्व रुग्णांच्या आवश्यक त्या चाचण्या करून घेण्याची जबाबदारी घेऊन,त्यांच्या  वैद्यकीय सेवेत मदत करत आल्या आहेत. डॉ.सुहृद हा त्यांचा मुलगा इंग्लंडमध्ये ट्रुरो येथील इस्पितळात श्वसनसंस्थेच्या विकारांच्या विभागाचा प्रमुख म्हणून काम पाहतो. अत्यंत कमी वयात त्याला ही खूप महत्वाचे पद तिथे मिळाले. ‘पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तिन्ही लोकी झेंडा!’ ही त्यांची पिता म्हणून असलेली आकांक्षा त्याने पूर्ण केली याचा त्यांना  खूप आनंद वावतो.त्यांची  मुलगी सौ.अमला फाटक ही पुण्यातच असते.
आज वैद्यकीय सेवेबद्दल आणि त्यातल्या नितीमत्तेच्या ऱ्हासाबद्दल नेहेमी बोलले जाते. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यामधील नाते नष्ट होत चालले आहे अशी ओरड सतत सर्वत्र होत असते. अशा जमान्यात डॉ.सरदेसाईंसारखा आदर्श धन्वंतरी सर्व डॉक्टरांना वादळी प्रवासात दिशा दाखवणारा अढळ ध्रुवताऱ्याप्रमाणे मार्गदर्शक ठरावा.

Saturday, March 14, 2020

Appeal for Misleading Social media Posts #COVID-19


Indian Medical Association, Maharashtra state appeals all the Citizens of India that,

If you come across any doubtful or misleading post in any social media, regarding COVID-19 treatment or effects, instead of forwarding it to other groups, please forward it to the following IMA WhatsApp number -

9823087561

We, at IMA will analyze it scientifically and reply back to you immediately.

If any post is found offensive, misleading or antisocial, IMA will file a complaint of Cybercrime against the Original Creator of that Post.



Dr. Avinash Bhondwe

President,

IMA Maharashtra State